आठ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक!

आठ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक!

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने रात्री उशिरा म्हणजे १ वाजता अटक केली. तब्बल ८ तास ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक केली गेली.

संध्याकाळी संजय राऊत यांना ईडीच्या फोर्ट येथील कार्यालयात आणण्यात आले होते. तिथे पुन्हा त्यांची चौकशी सुरू होती. पण अखेर रात्री उशिरा राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याआधी महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अशीच रात्री १ वाजता अटक करण्यात आली होती.

संजय राऊत यांच्यावर गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आरोप असून त्यासंदर्भात सकाळी ७ वाजता भांडुप येथील राऊत यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली होती. सकाळपासून तब्बल साडेनऊ तास राऊत यांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण त्या चौकशीनंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले.

हे ही वाचा:

सायन किल्ल्याच्या हौदाला नवा साज…

अ‍ॅक्सेल श्वानाने झेलल्या तीन गोळ्या; पण त्याने दहशतवाद्यांना शोधले

सीमाभागातील लोकांना जोडण्याचा ‘असीम’ आनंद

भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत मिळविले दुसरे सुवर्ण

 

घरी झालेल्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्यावर ते स्वतःच्या गाडीतून ईडी कार्यालयाकडे गेले. तिथे जाताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तिथे त्यांनी आपण झुकणार नाही. शिवसेना सोडणार नाही अशा घोषणा केल्या. ट्विटरवरही ते व्यक्त होत होते. मात्र अखेर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आल्यावर पुढे पुन्हा चौकशीला प्रारंभ झाला. त्यादरम्यान त्यांच्या घरातून ११.५० लाखांची रोकडही ईडीने जप्त केली.

८ वाजताचा भोंगा बंद झाला

त्यांचे बंधू व आमदार सुनील राऊत यांनी संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची प्रतिक्रिया नंतर दिली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली असून ८ वाजताचा भोंगा बंद झाला असे ते म्हणाले. सध्या मुख्यमंत्री संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत, तिथे त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

Exit mobile version