बेलगाम बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ नव्हे हे तर चोरमंडळ आहे, असे खळबळजनक विधान केले आहे. त्यावरून विधानसभेत भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्यावर घणाघात केला आहे.
आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवारांपर्यंत. अशा विधिमंडळाला राऊत चोर म्हणत आहेत. कोविडच्या केसमध्ये जवळच्या माणसाला अटक केली. त्याचे नैराश्य विधिमंडळावर काढत आहेत का? अध्यक्षजी विनंती आहे की, आजच्या आज हक्कभंग समितीकडे पाठवा आणि तातडीने सुनावणी घ्या. अपमानजनक बोलणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले आणि संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची सूचना दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही सूचना मिळाल्याचे म्हटले आहे. नार्वेकर त्याबाबत निर्णय देत असताना विधानसभेत गोंधळ झाला. त्यामुळे कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.
संजय राऊत यांच्या या विधीमंडळाच्या अवामान प्रकरणी मी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. या बेलगाम तोंडाळपणावर कारवाई झालीच पाहीजे. विधीमंडळावर वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार जामीनावर असलेल्यांना कधी पासून मिळाला? pic.twitter.com/lqp8U2AzYK
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 1, 2023
आमदार अतुल भातखळकर विधानसभेत म्हणाले की, अजित पवार म्हणतात एखाद्या नेत्याविषयी किंवा एखाद्या पक्षाविषयी…पण राऊत यांनी सरळसरळ म्हटले की विधिमंडळ नव्हे तर चोर मंडळ. हा सगळ्या विधिमंडळाचा अवमान आहे. माझ्याकडे वृत्तवाहिनीची क्लिप आहे त्यात म्हटले आहे की, विधिमंडळ नव्हे चोरमंडळ आहे. गुंडमंडळ आहे.
हे ही वाचा:
अंबानी कुटुंबाला Z+ सुरक्षा पुरविण्याचे ‘सर्वोच्च’ आदेश
१०० कोटींच्या कोविड घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक
राज्य पुरातत्व विभागाकडून कोल्हापूर अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी
मुंबईतील सेलिब्रिटिजच्या घरी बॉम्बस्फोट झाल्याचा फोन
संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांचाही कोविड घोटाळ्यात समावेश आहे. आता सुनील कदम आणि आरोपी राजीव नंदकुमार साळुंखे यांना अटक करण्यात आली होती. या दोघांविरोधात भारतीय दंड विधान 420, 406, 465, 467, 468, 471, 304(A) अंतर्गत अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना ६ मार्च २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यातूनच संजय राऊत यांनी खवळून विधिमंडळावरच अश्लाघ्य आरोप केल्याचे आमदार भातखळकरांचे म्हणणे आहे.
संजय राऊत हे आपल्या बेलगाम बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षात त्यांनी वारंवार आपल्या अशा बेफाम बोलण्यातून अनेकांवर आरोप केले आहेत. अगदी शिव्यांची लाखोली वाहिल्याचेही दिसले आहे. आता त्याचा कडेलोट करताना त्यांनी विधिमंडळालाच चोर मंडळ म्हटल्याने राऊत यांनी पातळी ओलांडल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरावर व्यक्त होत आहे.