मुडदे येतील… यावरून संजय राऊत लक्ष्य

मुडदे येतील… यावरून संजय राऊत लक्ष्य

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि आणखी आमदारांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, “मी बाप काढला अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, गुलाबराव पाटील यांच्या भाषणात ते स्वतःच बाप बदलण्याची भाषा करत आहेत. जे लोक बाप बदलतात, त्यांच्यासाठी त्या व्हिडीओमध्ये गुलाबराव पाटलांनी जे वक्तव्य केलंय, ते खरंच मार्गदर्शक आहे. गुवाहाटीमध्ये जे लोक बसलेत, त्या सर्वांसाठी गुलाब पाटलांचं जे भाषण मी ट्वीट केलंय, ते पाहण्यासारखं आहे. लोकं कसे आपला बाप बदलतात, बेइमान होतात, पक्षात खातात, पितात मोठे होतात आणि आपला बाप बदलतात. आम्ही बाप बदलणाऱ्यांपैकी नाही, हे गुलाबराव आपल्या भाषणात म्हणाले आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यानंतर त्यांनी दीपक केसरकर आणि इतर आमदारांवर टीका केली आहे.

त्यानंतर संजय राऊत यांनी ४० आमदारांची प्रेतं येतील पण त्यांचा आत्मा मेलेला असेल असं वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले की, “जे लोक ४० वर्षे पक्षात राहतात आणि त्यानंतर पक्ष सोडतात, त्यांचा आत्मा मेलाय. मग काय उरतं? जिवंत मुडदे. हे शब्द नवे नाहीत महाराष्ट्र आणि देशासाठी. पण समजून घ्या तुमची बुद्धी आहे, ती कुंठित झाली आहे. तुमचा संपर्क महाराष्ट्राशी, मराठीशी, समजाशी, तुटलाय त्यामुळे तुम्हाला माझी भाषणं कळत नाहीत. मी कोणाच्याच आत्मा आणि भावनांना ठेच पोहोचवली नाही. मी फक्त सत्य बोललोय. तुमचा आत्मा मेलाय म्हणून तुम्ही जिवंत मुडदे बनलायत,” असे संजय राऊत म्हणाले.

उदय सामंत शिंदे गटात सामील झाले. हा मोठा धक्का आहे का? याबाबत राऊतांना विचारलं असता ते म्हणाले की, “हा मोठा धक्का नाही. उदय सामंत सर्वांचे जवळचे होते. दीपक केसरकर आमचे जवळचे आहेत. तिथे असलेला प्रत्येक व्यक्ती आमच्या जवळचा आहे. एकनाथ शिंदे आमच्या सर्वात जवळचे आहेत.”

हे ही वाचा:

अयोध्येच्या निर्मली कुंड चौक परिसरात आढळले हातबॉम्ब

“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”

“शिवसेना पक्ष प्रमुखांना राऊतांसारखा प्रवक्ता चालतो का?”

बंडखोर आमदारांवरील कारवाईची वकिलांनी सांगितली कायदेशीर बाजू

महाराष्ट्राची माती ही गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना माफ करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची फोनवरुन चर्चा झाल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, “फक्त मनसेच नाही, तर एमआयएममध्येही ते जाऊ शकतात. फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार,” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

Exit mobile version