शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मत
राज्यातील राजकीय हालचाली सुरू असताना या सर्व घटनांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना दुसरीकडे बहुमत चाचणीचे आदेश देणे चुकीचे असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच शिवसेना या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयावर विश्वास असल्याचे संजय राऊत म्हणाले. राज्यपालांनी दोन वर्ष १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर आता एकाच दिवसात सरकारला बहुमत चाचणीचे आदेश देतात, अशी टीका त्यांनी केली.
विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची होती. त्यामुळेच १२ आमदारांची फाईल रखडवली असल्याचे संजय राऊत म्हणाले. भाजपाकडून संविधानाच्या चिंधड्या उडवल्या जात असल्याचंही ते म्हणाले.
हे ही वाचा:
महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये भीषण आग
सरकारला आली जाग! औरंगाबादचे संभाजीनगर करणार
‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक
संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याचे बंडखोर आमदारांकडून सांगण्यात येत आहे यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पक्षाची भूमिका मांडत असतो. शिवसैनिक म्हणून बोलत असतो. त्यामुळे काहींना आक्षेप असल्यास मी माध्यमांशी बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले.