शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातलं राजकार चांगलच ढवळून निघालं आहे. मात्र, अजूनही शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सरकार अल्पमतात नसून सरकार आपली राहिलेली अडीच वर्षे पूर्ण करेल आणि पुन्हा निवडूण येईल असा दावा करत आहेत.
संजय राऊत यांनी आज पुन्हा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना खुलं आव्हान दिलं आहे. “तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावाल, त्यांचे भक्त आहोत असं म्हणाल. पण बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर खुपसणार नाही. जे व्हायचंय ते होऊ द्या. जे करायचंय ते करा. मुंबईत तर यावं लागले ना? तिथे बसून आम्हाला सल्ला-मार्गदर्शन करत आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
लाखो शिवसैनिक रआमच्या एका इशाऱ्याची वाट पाहात आहेत. पण आम्ही अजूनही संयम ठेवला आहे. त्यामुळे कोण शक्तीप्रदर्शन करत आहेत, कोण काय करतंय त्यानं काही फरक पडत नाही, असं संजय राऊत म्हणाले. “ते जेव्हा इथे येतील तेव्हा कळेल नक्की बंडखोरी कुठे होणार आहे. अस्वस्थता हा शब्द खूप सौम्य आहे. बंडखोरांमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के देणार राजीनामा
यूपीच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या तयारीत योगी सरकार
“जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या. मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी राजीनामे दिले. ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंचे २२ लोक फुटले. त्यांनी राजीनामा दिला. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवलं. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्या. कितीही असू द्या. ५४ असू द्या. राजीनामे द्यायचे आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझं खुलं आव्हान आहे. तुम्ही गुवाहाटीत बसून आम्हाला शिवसेनेची, हिंदुत्वाची अक्कल शिकवणार,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांच्या गटाला आव्हान दिलं आहे.