ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. खासदार संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
ईशान्य मुंबईमधून निवडणूक लढवणार का? असा सवाल पत्रकाराने विचारला असताना संजय राऊत म्हणाले, “पक्षाने आदेश दिला तर तुरुंगातही जातो. आदेश आल्यावर आम्ही काहीही करतो. बाळासाहेबांसोबत काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज, पक्षाचा आदेश जो असेल ते मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. ईशान्य मुंबईत राऊत सोडून द्या साधा शिवसैनिक जरी उभा राहिला तरी सव्वा दोन लाख मतांनी विजयी होईल,” असा दावा संजय राऊत यांनी बोलताना केला.
ईशान्य मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या मदतीने सातत्याने भाजपचा उमेदवार ईशान्य मुंबईत निवडून आला आहे. त्यामुळे इथे आमच्यातील साधा कार्यकर्ता, पदाधिकारी आणि कोणीही उभा केला तरी ईशान्य मुंबईत शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल, असे संजय राऊत म्हणाले.
दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “शरद पवारांच्या नावावर निवडून आला ना? हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवार प्रमुख नेते आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांना जे पदं मिळाली ते शरद पवार या नावामुळेच. आर आर पाटलांसारखा साधा कार्यकर्ता या राज्याचा उपमुख्यमंत्री झाला नसता. छगन भुजबळ तुरुंगातून आल्या आल्या मंत्री झाले नसते. हे सर्व शरद पवारच करू शकतात,” असं राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
गंगोत्री महामार्गावर भाविकांची बस दरीत कोसळून अपघात, सहा भाविकांचा मृत्यू
बद्रीनाथ महामार्गावरील ७० मीटरचा रस्ता खचला
भारताने विकसित केलेली AI आधारित ‘भाषिणी’ लवकरच येणार
रजनीकांतचा नवा चित्रपट पाहणार योगी; लखनऊमध्ये होणार शो
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना शरद पवारांनीच घडवलं. जसं बाळासाहेब नसते तर आम्ही कोण असतो? आज आम्ही जे आहोत ते बाळासाहेबांमुळेच आहोत. आज राष्ट्रवादीचे नेते इकडे तिकडे खुर्च्यांवर बसले आहेत ते केवळ शरद पवार यांच्यामुळेच आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.