शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना आता नवं चिन्ह आणि नाव घ्यावं लागणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच कोठडीत असणारे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. संजय राऊत म्हणाले की, “कदाचित नवीन चिन्ह हे शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. असं काही घडल्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वी इंदिरा गांधी देखील अशाच परिस्थितीतून गेल्या होत्या. काँग्रेसचे तीनवेळा चिन्ह गोठवले होते, तर जनता दलाचेही चिन्ह गोठवले होते,” असं संजय राऊत म्हणाले.
“नावात काय आहे. शिवसेना नाव गोठवले तरी शिवसेना तीच आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही,” असंही संजय राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सध्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे, असं वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं आहे.
हे ही वाचा:
निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
शिंदे गट ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल
चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच
मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत हे कोठडीत आहेत. आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. खासदार संजय राऊत हे सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहेत. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत हेच मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे.