ठाकरे गट, काँग्रेस वादावर संजय राऊतांची सारवासारव; वैयक्तिक टीका न केल्याचे वक्तव्य

राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न

ठाकरे गट, काँग्रेस वादावर संजय राऊतांची सारवासारव; वैयक्तिक टीका न केल्याचे वक्तव्य

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात धुसपूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जागा वाटपाचे निर्णय घेण्यास राज्यातील काँग्रेस नेतृत्व सक्षम नसल्याचे संजय राऊत म्हणाले होते. शिवाय थेट दिल्लीत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. याबाबत नाना पटोले यांनीही संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं प्रत्युत्तर दिलं होते. मात्र, आता खासदार संजय राऊत यांनी मी नाना पटोलेंविषयी बोललो नसल्याचे म्हणत राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, चर्चा पूर्णपणे थांबली असे म्हणता येणार नाही. काल दिवसभर आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्यातील बरेच पेच सुटत चालले आहेत. एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता आमच्या दोघांमध्ये आहे. आम्ही अनेक जागांवरचा तिढा सोडवलेला आहे. आता महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबई येतील आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. मग पुढे काय मार्ग निघेल ते बघू,” असे संजय राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले की, “मी नाना पटोलेंविषयी बोललो नाही. माझ्या तोंडी घालू नका. कोणावरही व्यक्तीगतरित्या मतप्रदर्शन केलेलं नाही. प्रत्येकवेळी आघाड्या तयार होतात तेव्हा अशा प्रकारचे अडथळे निर्माण होतात. भाजपा शिवसेना एकत्र होते तेव्हाही अडथळे होते. काँग्रेस पक्ष मोठा आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष असून राष्ट्रीय पक्षांनी त्या त्या पक्षांना राज्यात स्थान दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. प्रादेशिक पक्षांच्या जोरावर सध्या राष्ट्रीय राजकारण सुरु आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

विमानांना धमकीसत्र सुरूच; एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा विमानांना बॉम्बची धमकी

ईडीकडून पीएफआयच्या ३५.४३ कोटी किंमतीच्या १९ मालमत्ता जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणी आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्यासह माजी आमदार गुलाब यादव यांना अटक

फतवा निघाला, हिंदू संताची बाजू घेणाऱ्या शिंदे-फडणवीसांना पराभूत करा…

“माझी भूमिका ही धोरणात्मक आणि पक्षाची असते. मी उद्धव ठाकरेंच्या परवनागी शिवाय कधी काहीही बोलत नाही. नाना पटोले चर्चेसाठी नको अशा प्रकारच्या भूमिका आम्ही मांडल्याचे मला आठवत नाही. अशा प्रकारच्या भूमिका कोणी घेत नाही. तसं कोणी इतर पक्षांनी सांगितले तर मला माहिती नाही,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version