“तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का?”

संजय राऊतांचा शरद पवारांना सवाल

“तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का?”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा होत्या. त्यासंदर्भातील फोटो, व्हिडीओही व्हायरल झाले होते. या बैठकीवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

“तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का? आमचेही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत. मग आम्हीही त्यांच्यासोबत चहा पित बसलो तर चालेल का? हे आमच्या डीएनएत नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. अशी कृती भीष्म पितामहकडून होता कामा नये, असा खोचक सल्ला त्यांनी शरद पवारांना दिला आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या गुप्त बैठकीची उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली आहे. राज्यात वारंवार संभ्रमाचे वातावरण होत आहे. त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होतो. शरद पवार म्हणाले, अजितदादा पुतणे आहेत. असू शकतात. रोहित पवारांचेही वक्तव्य ऐकलं. नातीगोती सांभाळायची असतात, असं रोहित पवार म्हणाले. तुम्ही नातीगोती सांभाळायची तर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का मारामारी करायची? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

“आम्ही उद्या एकनाथ शिंदे आणि इतरांसोबत चहा प्यायलो लागलो तर कसे होईल? आम्ही नेत्यांनी विरोधकांसोबत बसायचं, नातीगोती व्यवहार सांभाळायची, कार्यकर्त्यांनी विचारधारेसाठी भांडायचं हे ढोंग शिवसेनेच्या डीएनएमध्ये नाही. ही लढाई देशासाठी आहे. महाभारताप्रमाणे स्वकीय असो की परकीय, लढाई ही लढाई असते. राज्याच्या अस्मिता आणि देशाचं अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे,” अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचं नेतृत्व निदान भीष्मपितामहकडून होता कामा नये, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

सुशील कुमारचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण

पीएफआय षडयंत्र प्रकरणी एनआयएकडून ५ राज्यांत १४ ठिकाणी छापे!

भूमाफिया लेडी डॉन करीना शेखसह तिघांवर गुन्हा

पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या गटावर दहशतवादी हल्ला

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी आमचा दोस्ताना होता. पण, राजकारणात आपण वेगळे आहोत याची भावना ठेवूनच आम्ही त्यांच्याशी अंतर राखून आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होणार नाही हे पाहिलं पाहिजे. कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरायचं, गोळ्या खायच्या, तुरुंगात जायचं आणि ज्यांच्यामुळे जे घडलं त्यांच्यासोबत चहा प्यायची हे आमच्या डीएनएमध्ये नाही. त्यांचा डीएनए वेगळा आहे, आमचा डीएनए वेगळा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी शरद पवारांवर केली.

Exit mobile version