माविआकडून जागावाटपात चुका झाल्यात; त्या स्वीकारल्या पाहिजेत

संजय राऊतांची कबुली

माविआकडून जागावाटपात चुका झाल्यात; त्या स्वीकारल्या पाहिजेत

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा घोळ दोन दिवसांत संपला असता, तर याचा नक्कीच फायदा झाला असता प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला असता, अशी नाराजी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता व्यक्त केली. त्यामुळे निवडणुकीनंतरही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून नाराजी नाट्य कायम असल्याचे चित्र आहे. अशातच आता वडेट्टीवार यांच्या नाराजीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मविआचे जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य

संजय राऊत म्हणाले की, “जागावाटपाची प्रक्रिया ज्या पद्धतीने लांबवली गेली किंवा लांबली गेली त्याची गरज नव्हती, हे आमच्या सगळ्यांचच म्हणणं आहे. आता ही प्रक्रिया का, कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

चुका झाल्यात आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत

पुढे संजय राऊत म्हणाले की, “कोणत्याही आघाडीमध्ये जागावाटप इतक्या विलंबाने झालं तर एक अस्वस्थता पसरते आणि कार्यकर्त्यांना काम करायाला वेळ मिळत नाही. याउलट महायुतीमध्ये साधारण दोन महिन्यांपूर्वी जागावाटपण संपलेलं होतं, बाकी त्यांच्या चर्चा वगैरे सुरू असतील, पण जागावाटप संपलं होतं. विजय वडेट्टीवार यांची वेदना ही संपूर्ण मविआची वेदना आहे. चुका झाल्यात आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत,” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागावाटप झालं हे आम्ही तेव्हाही सांगत होतो, पण आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि त्यांच्या सर्वात कमी जागा जिंकून आल्या

“जागावाटपावेळी नाना पटोले आणि माझ्यात वाद झाला होता. काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि त्यांच्या सर्वात कमी जागा जिंकून आल्या. आम्हाला २० जागांवर विजय मिळाला, पण आता त्यावर कशासाठी वाद करायचा. जागावाटपाला विलंब झाला, हाच मुद्दा आहे. तेव्हा विजय वडेट्टीवारही होते. विदर्भातील काही त्यांनी जागा ठाकरे गट आणि पवार गटासाठी सोडल्या असत्या तर बरे झाले असते. ज्या जागा काँग्रेस हरली आहे. किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार होते, पण ते पवार गटाकडून लढायला तयार होते. त्याचं जागेवर १७ दिवस घोळ सुरू होता. पुढे किशोर हे भाजपात गेले आणि जिंकून आले. अशा अनेक जागा आहेत,” असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.

आम्हीच जिंकू आम्हाला जास्त जागा पाहिजेत, असं काहींना वाटत होतं

“काही लोकांना वाटत होते की, आम्हीच जिंकू आम्हाला जास्त जागा पाहिजेत. देशातलं वातवरण बदललं आहे. तेव्हा आमचं असं म्हणणं होतं की आपण एकत्र आणि काळजीपूर्वक लढायला हवे. समोर आव्हान मोठे आहे. लोकसभेतील यशानंतर समोरचा पक्ष सावध झालेला आहे. त्यामुळे आमचं तुमचं न करता एकत्र लढायला हवे, असं मतं होतं,” असं म्हणत संजय राऊत यांनी नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला.

हे ही वाचा : 

मविआचा जागावाटप घोळ दोन दिवसांत संपला असता तर नक्की फायदा झाला असता

“राजकारणात महत्त्वाकांक्षा घेऊन नव्हे तर ध्येय घेऊन या!”

“धर्मनिरपेक्षता काय आहे हे भारताला शिकवण्याची आवश्यकता नाही”

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करावेत

विधानसभा निकालानंतर मविआच्या तीन पक्षात अजिबात समन्वय राहिलेला नाही

लोकसभा निवडणुकीनंतर ‘इंडी’ आघाडीची बैठक झालेली नाही. बैठक व्हायला हवी होती. तसेच राज्यात विधानसभा निकालानंतर मविआच्या तीन पक्षात अजिबात समन्वय राहिलेला नाही हे सत्य आहे. हे असेच चालू राहिले तर भविष्यात याची किंमत सर्वांना मोजावी लागेल, असं म्हणत संजय राऊत यांनी ‘इंडी’ आघाडी आणि मविआमधील समन्वयाचा अभाव असल्याची कबुली देत टीका केली.

‘इंडी’ आघाडी आणि मविआमध्ये काही दुरुस्ती करता येतील का असा विचार करायला हवा

पुढे ते असंही म्हणाले की इंडी आघाडीचा प्रभाव कुठेही विधानसभेत दिसला नाही प्रत्येकजण आपापलं घोडं दामटवत राहिला. त्यामुळे काही नेत्यांनी वेगळ्या भूमिका घेतल्यात त्याला जबाबदार कोण? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच काँग्रेस हा देशातील मोठा पक्ष असून त्यांनी सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत, असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला आहे. ‘इंडी’ आघाडी आणि मविआमध्ये काही दुरुस्ती करता येतील का असा विचार करायला हवा, असंही संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version