पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीफ करणाऱ्यांना अंधभक्तांच्या यादीत टाकण्याची टूम गेल्या काही वर्षात आली आहे. आता तर खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाच अंधभक्तांच्या यादीत टाकले जाईल की काय अशी शंका उपस्थित केली आहे. अजित पवारांप्रमाणेच शरद पवारांनीही अदानींच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे विरोधकांत नाराजी आहे. संजय राऊत यांच्या या ताज्या विधानामुळे महाविकास आघाडीला आणखी तडे जातील का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी बांगलादेशात ईव्हीएम मशीनवर बंदी घालून बॅलट पेपरवर मतदान घेण्याच्या निर्णयाचे मध्यंतरी स्वागत केले होते. त्यावर अजित पवार यांनी भारतातील अनेक राज्यात काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष हे ईव्हीएम मशीनवर जिंकले आहेत त्यामुळे त्यावर शंका उपस्थित करणे योग्य नाही, अशी भूमिका घेतली. पण संजय राऊत यांना अजित पवारांचे ते उत्तर आवडलेले नाही. ते म्हणतात की, अजितदादांची गणना अंधभक्तात होऊ नये अशी अपेक्षा आहे.
पत्रकारांनी संवाद साधताना संजय राऊत यांना अजित पवार यांच्यावर हे शरसंधान केले. त्यांना जेव्हा अजित पवारांच्या उपरोक्त उत्तराबद्दल सांगण्यात आले तेव्हा संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएमसंदर्भात दिल्लीत शरद पवारांकडे बैठक झाली होती. विरोधी पक्षांचा ईव्हीएमवर आक्षेप आहे. निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. अजित पवारांचा कदाचित ईव्हीएमवर विश्वास असेल पण जनतेचा नाही. भाजपचे भक्त, अंधभक्त आहेत त्यांच्यात अजित पवार यांची गणना होऊ नये अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
रिंकू सिंगचे शेवटच्या षटकात ५ षटकार, कोलकात्याने सामना फिरवला, गुजरातची हार
आल्प्स पर्वतरांगांमध्ये हिमस्खलनात चार जणांचा मृत्यू, अडकलेले बहुतांश गिर्यारोहक
कर्नाटक स्पोर्टिंगने जिंकली पद्माकर तालीम शिल्ड
मंदिर वही बनायेंगेचा नारा सत्यात उतरतांना बघतोय
ईव्हीएम मशीनच्या वापरावरून चर्चा होत असते. नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात आल्यापासून ईव्हीएम मशीनवर विरोधकांनी सातत्याने शंका घेतली आहे. ईव्हीएम मशीनवर मतदान केल्यावर ते मत भाजपाला जाते असा आरोप विरोधकांकडून केला जातो. पण याच ईव्हीएम मशीनच्या आधारे विविध राज्यात भाजपेतर सरकारेही आली आहेत. त्यावेळी मात्र ते पक्ष ईव्हीएमवर आक्षेप घेत का नाहीत, असा सवाल भाजपाकडून विचारण्यात येतो. अगदी तसाच प्रश्न अजित पवारांनीही विचारला. दिल्ली, पंजाबमध्ये आम आदमी पक्ष, राजस्थानात काँग्रेस, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसचे सरकार हे ईव्हीएम मशीनवर मतदान करूनच आलेले आहे. त्यामुळे या तंत्राला विरोध करणे योग्य नाही, असे अजित पवार म्हणाले होते.