लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा यशस्वी पार पडला असून आता उर्वरित टप्प्यातील निवडणुका बाकी आहेत. यासाठी सर्वच पक्ष प्रचाराच्या कामाला लागले असून सभा, रॅली यांचा धडाका सुरू आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील राजकारण तापल्याचे चित्र आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात असून आता नवनीत राणा यांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
“कोण संजय राऊत? एखादी महिला जेव्हा काम करत असते तेव्हा तिला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. यांच्यासारख्या लोकांनी सीतेलाही तिचे भोग भोगायला लावले. मी अमरावतीची सून आहे. तरीही माझा अपमान केला. संजय राऊतांनी बोलताना ज्या मुलीची लग्नानंतर सासरी पाठवणी केली तिचा आणि ज्या आईच्या पोटातून जन्म घेतला त्या आईचा विचार करायला हवा होता. माझ्यावर टीका करण्याआधी स्वतःच्या पत्नीकडे एकदा बघायचं होतं. एखादी महिला सार्वजनिक क्षेत्रात काम करते म्हणजे तिचा स्वाभिमान विकत नाही. नवनीत राणासह अमरावतीतल्या प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जोडला गेला आहे. संजय राऊत यांनी माझाच नाही प्रत्येक महिलेचा अपमान केला आहे,” अशी खरमरीत टीका नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
हे ही वाचा:
‘माझ्या मुलीची हत्या ‘लव्ह जिहाद’मुळे’
मोदीस्तुती करणारे गाणे गाणाऱ्या युट्युबरवर मुस्लिम तरुणांचा हल्ला
मुंबईचा पैसा, लखनौची जमीन, ठाकरेंच्या नावाने गलका…
छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, गोडसेंचा मार्ग मोकळा!
“ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या बाईने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीविषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले. त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. ती नाची, डान्सर, बबली तुम्हाला खुणावेल. पडद्यावरून इशारे करेल. पण भुरळून जाऊ नका. अशा एका अप्सरेने विश्वामित्रांनाही फसवले होते हे विसरु नका,” असं संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे.