पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईच्या दौऱ्यावर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला बाजुला ठेवून नव्या आघाडीचे संकेत दिले असले तरी शिवसेनेचा मात्र त्याला पाठिंबा नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अशा आघाडीसाठी काँग्रेसला सोबत घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात काँग्रेससोबत असलेल्या सरकारला कुठेही धोका पोहोचू नये, हा राऊत यांच्या या भूमिकेमागील उद्देश असला पाहिजे, अशी चर्चा होऊ लागली आहे.
संजय राऊत शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी बनू शकत नाही. असे झाले तर त्याचा भाजपालाच लाभ होईल.
राऊत म्हणाले की, ममता बॅनर्जींचा आम्ही आदर करतो, त्यांच्या विचारांचा आदर करतो पण विविध राज्यांत काँग्रेस मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे काँग्रेसला सोबत घेऊनच नव्या आघाडीचा विचार होऊ शकतो.
हे ही वाचा:
‘पेंग्विनवर दिवसाला दीड लाख खर्च; पण लहान बाळासाठी यांना वेळ नाही’
सावरकरांचा अपमान केल्यामुळे फडणवीसांची साहित्य संमेलनाकडे पाठ
न्यूझीलंडच्या अजाझ पटेलने नोंदविला १० बळींचा विक्रम
डॉ. सच्चिदानंद शेवडेंच्या पुस्तकाचे होणार आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते प्रकाशन
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत काँग्रेसही सत्तेत आहे. त्यामुळे काँग्रेसला दूर ठेवून नवा पर्याय देण्याचा ममता बॅनर्जींचा विचार शिवसेनेला परवडणार नाही, हे लक्षात घेऊन राऊत यांनी सारवासारव करण्याचा हा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून अग्रलेखात ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यात आला असून यूपीएच्या माध्यमातूनच भाजपाचा मुकाबला करणे शक्य आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेशात राहुल गांधी, प्रियांका गांधी उत्तम काम करत असल्याचेही त्यात नमूद केले आहे. पण ज्यांना काँग्रेसचे नेतृत्व मान्य नाही त्यांनी हात वर करून सांगावे. यूपीएसंदर्भात राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासमोर येऊन विरोध दर्शवावा.