ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे चर्चांना उधाण आले आहे. या दोघांनीही एक फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार अशी नावे लिहिलेली आहेत. यामधील महायुतीमधील नेत्यांची म्हणजेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची नावे गुजरातीमध्ये लिहिण्यात आली आहेत. यामुळे संजय राऊत आणि रोहित पवार हे या पोस्टच्या माध्यमातून गुजराती विरुद्ध मराठी असे भांडण लावून नरेटिव्ह सेट करत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या ‘इंडी’ आघाडीकडून संविधान बदलणार असा नरेटिव्ह सेट करण्यात आला होता. याचा विरोधकांना काही ठिकाणी काही अंशी फायदाही झाल्याचे पाहायला मिळाले. पण, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर विरोधकांनी मतांचे राजकारण करण्यासाठी संविधान बदलणार असा नरेटिव्ह सेट केल्याचे समोर आले होते. यावर अनेक बड्या नेत्यांनी भाष्य देखील केले. लोकसभेत संविधानाबाबतचे फेक नरेटिव्ह पसरवले पण त्यात यश न आल्याने आता महाराष्ट्रातील विरोधक गुजराती विरुद्ध मराठी असे भांडण लावून एक प्रकारचा नरेटिव्ह सेट करत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जय महाराष्ट्र!!!! pic.twitter.com/kj7TfJFOnG
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 14, 2024
हे ही वाचा :
बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच दिल्लीतल्या गल्लीगल्लीत फिरावं लागतंय!
काँग्रेस पक्ष सरकार स्थापनेसाठी विकासावर नाही तर विभाजनावर अवलंबून
मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या राजस्थानमधील उमेदवाराला अटक
झारखंडमध्ये काँग्रेस घुसखोरांनाही देणार गॅस!
विधानसभा निवडणूक मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असून संजय राऊत आणि रोहित पवार यांच्याकडून असे ट्वीट केले जात असल्यामुळे त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात नृत्य कार्यक्रमात सहभागी झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता शिवाय उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. हाच मुद्दा उपस्थित करून लोक सोशल मीडियावर गुजरात द्वेष व्यक्त करणाऱ्या संजय राऊत आणि रोहित पवारांना जाब विचारत आहेत. शिवाय २०१९ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान आदित्य ठाकरे यांनी गुजराती भाषेतील मोठे फलक वरळी भागात लावले असल्याची आठवणही लोकांनी करून दिली आहे.