शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपा आमदार किरीट सोमय्या यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी INS विक्रांत युद्धनौकेसाठी गोळा केलेल्या निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी आज नव्या घोटाळ्याचे नाव समोर आणले आहेत. किरीट सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचे त्यांनी आज म्हटले आहे.
लवकरच किरीट सोमय्या यांचा टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मिरा भाईंदर महापालिका आणि राज्यात इतर ठिकाणी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा झाला आहे. यामध्ये किरीट सोमय्यांचा सहभाग आहे, असे आरोप संजय राऊतांनी आज केले आहेत.
या घोटाळ्याची सर्व कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. युवा प्रतिष्ठान एनजीओद्वारे शेकडो कोटी रुपयांचा टॉयलेट घोटाळा केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करून हा घोटाळा करण्यात आला आहे. या सर्वांवर देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं, असे संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रभक्ती उफाळून आली आहे. त्यांनी शरद पवारांवर ट्विट केले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी एखादं ट्विट टॉयलेट घोटाळ्यावर करावे. तुम्ही आमच्यावर कितीही फुसके आरोप केले तरी आम्ही मागे हटणार नाही. राजभवनाने सांगितले आहे की पैसे जमा झालेले नाहीत. लोकांची दिशाभूल करू नका. विक्रांतसारखा टॉयलेट घोटाळा देखील महाराष्ट्रात दुर्गंधी निर्माण करणार आहे.
हे ही वाचा:
एसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा!
देशभरातील १० हजार मंदिरांना मोहित कंबोज देणार लाऊडस्पीकर
तसेच त्यांनी न्यायव्यवस्थेवरही टीका केली. भाजपच्या काही लोकांना सतत दिलासा मिळतोय. दिशा सालियान प्रकरण, मुंबई बँक ते आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यातील आरोपीपर्यंत सर्वांना दिलासा मिळत आहे. न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का? दिलासा देण्यासाठी न्यायाव्यवस्थेत विशेष लोक बसविण्यात आले आहे का? अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.