शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या काही मालमत्तांवर मंगळवार, ५ एप्रिल रोजी ईडीने कारवाई केली. ही कारवाई झाल्यानंतर अचानक आज ६ एप्रिल रोजी संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेले कागदपत्रे संजय राऊत यांनी माध्यमांना दाखवून किरीट सोमय्या हे देशद्रोही असल्याचे आरोप केला आहे.
आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्याय यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत ही माहिती मागवली होती. एक महिन्यापूर्वी ही माहिती समोर आली होती. राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्या यांनी आंदोलन केले होते. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमवला होता. मुंबई मध्ये अनेक ठिकाणी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली होती. या दरम्यान ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी केला होता. किरीट सोमय्या यांच्यासह इतर नेतेदेखील यामध्ये सहभागी होते. मात्र, या भ्रष्टाचाराच्या कटाचे प्रमुख किरीट सोमय्या होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी जमवलेले हे पैसे राजभवनात पोहचवलेच नाही. महाराष्ट्र सरकार यावर कारवाई करेल. मात्र, केंद्र सरकार काय करणार हे पाहायचे आहे. केंद्रीय तपास यंत्रणा पारदर्शक असतील तर त्यांनी चौकशी करावी. ईडी, सीबीआयकडून प्रकरणाची चौकशी व्हावी, असे संजय राऊत म्हणाले. किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या आणि मुलाच्या कंपनीत ही रक्कम वापरली असेल. ते स्वतः सीए असल्यामुळे त्यांना अशी रक्कम कशी जिरवायची हे माहित आहे, अशी टीका त्यांनी केली.
हे सगळे महाराष्ट्रद्रोही आहेत. किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. संजय राऊत आणि शिवसेना ही कीड संपवणार. आयएनएस विक्रांतच्या नावाने पैसे गोळा करतात. राज्यपाल कार्यालयातून आलेला कागद पुरावा असू शकतो. माध्यमांवर आता सोमय्या यांचे पैसे गोळा करत असतानाचे फोटो फिरत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. अजून काय पुरावा हवा. काश्मीर फाइल्स चित्रपट बघून झाला असेल तर आता आयएनएस विक्रांत फाईल पहा. आत्मा जिवंत असेल तर या माणसावर कारवाई करा, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हे ही वाचा:
कलम ३७० हटवल्यानांतर, नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरला करणार पहिला दौरा
सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत डेहराडूनमध्ये संघाची महत्वपूर्ण बैठक
अतिरिक्त आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी देणारे सपा नेते अटकेत
… म्हणून केंद्राकडून २२ यू-ट्युब वाहिन्यांना ‘टाळे’
संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. तर त्यासोबतच अलिबाग येथील संजय राऊत यांच्या परिवाराशी संबंधित आठ जमिनीही जप्त करण्यात आल्या आहेत. पत्राचाळ घोटाळ्याशी संबंधित पैसा अलिबाग येथील जमिनी खरेदी करण्यासाठी वापरल्याचा ठपका संजय राऊत आणि कुटुंबीयांवर ठेवण्यात आला आहे.