संजय राऊत शरद पवारांसाठी पुन्हा धावले!

संजय राऊत शरद पवारांसाठी पुन्हा धावले!

नेमकेचि बोलणे या शरद पवारांच्या ६१ भाषणांच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी झाले. त्यावेळी भाषणात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर स्तुतिसुमनांची उधळण केली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून संजय राऊत हे शरद पवार यांची स्तुती करताना हात आखडता घेत नाहीत. शरद पवारांना ओळखण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील पासून शरद पवारांच्या उंचीचा या देशात नेता नाही, अशी वाक्ये संजय राऊत यांनी उल्लेखिलेली आहेत.

दिल्लीत राज्यसभेबाहेर धरणे धरून बसलेल्या निलंबित खासदारांना भेटायला गेलेल्या शरद पवारांना खुर्ची देतानाचा संजय राऊत यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून संजय राऊत यांच्यावर टीका झाली होती. पण संजय राऊत या कार्यक्रमात पुन्हा एकदा शरद पवारांच्या प्रेमात पडल्याचे दिसले.

नेमकेचि बोलणे शरद पवारांच्या भाषणांवरील पुस्तक. प्रथमच पुस्तक घेऊन भाषणाला उभा राहिलो आहे. तुमच्या विचाराला भगवं कव्हर घातलं आहे. आपण महाविकास आघाडीचा एक ग्रंथ निर्माण केला आहे. त्याला भगवं कव्हर घातलं आहे. आपण पवारांचा विचार कसा पुढे नेत असतो, एकमेकांच्या रंगात कसे मिळत असतो. अवघा रंग एकच झाला आहे.

महाराष्ट्र हा देशाला काही विचार देत असतो. शरद पवार सतत विचार देत असतात. त्यांची ही ६१ भाषणं आहेत. शरद पवार हे विचारांशी पक्के असतात, असेही राऊत म्हणतात.

यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत खिल्ली उडविली आहे. आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की,  राऊत हे पवारांचे चेले आहेत हेही आम्हाला अलीकडेच समजलं. असो… पवार यांनी २५ वर्षांपूर्वी सांगितलेले खरे की लोणकढी हा विषय बाजूला ठेवू, पण ते राऊतांना इतक्या उशीरा कळले असेल तर दोष त्यांच्या IQ चा आहे.

मी पवारांना खुर्ची बसायला दिली त्यावर टीका झाली. पण मी पवारांना खुर्ची का दिली हे समजून घेण्यासाठी ६१ भाषणे वाचा. जे टीकाकार आहेत. विकृत प्रकारे त्या प्रसंगावर टीका करत होते. त्यांनी हा ग्रंथ वाचल्यावर त्यांना कळेल की, माझ्यासारख्या सामान्य लेखकाने, पत्रकाराने, पवारांना खुर्ची दिली ती विद्वत्तेचा मान म्हणून. देशात विकृत राजकारण सुरू आहे. विचार मांडायचा नाही ही प्रवृत्ती झुंडशाही आहे. पण प्रश्न विचारलेले शरद पवारांना आवडतात, उत्तरं द्यायला आवडतात, उत्तरं शोधायला आवडतात.

हे ही वाचा:

सौदी अरबमध्ये तब्लिघी जमातवर बंदी

‘ओबीसी आरक्षण संपवण्याचा ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा डाव उघड’

बांधकाम व्यावसायिकाने म्हाडालाच घातला गंडा

‘घोटाळा केला असेल तर तुम्हीच सरकारी पाहुणे व्हाल’

 

राऊत म्हणाले की, देशातील जनतेला हिंमत देणारे महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता जपणारे, कर्तबगारीला संधी देणारे कार्यक्षमतेला वळण देणारे शरद पवार आम्ही पाहतो आहोतच. आम्ही त्यांच्यावर टीकाही केली. त्यांच्या या ६१ भाषणांत यशवंतराव कुठेतरी आपल्याशी हितगुज करत आहेत, असे वाटते. पवारांना यशवंतरावांचे राजकीय वारसदार म्हटले जाते. पवारसाहेबांच्या नेतृत्वाने राज्याला, राज्यशकटाला, समाजाला दिशा व गती देण्याचं काम गेल्या ४० वर्षांत केले आहे.

Exit mobile version