लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून ठिणगी पडली असून तीनही घटक पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.अशातच मुंबईतील जागांवर ठाकरे गटाने दावा सांगितल्यानंतर काँग्रेस पक्षाचे माजी नेते संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत ठाकरे गटावर आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. यानंतर काँग्रेसने निरुपम यांचे पक्षातून निलंबन केले होते. शिवाय त्यापूर्वी संजय निरुपम यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता संजय निरुपम यांनी ठाकरे गटाच्या संजय राऊत यांना टार्गेट केले आहे.
पत्रकार परिषद घेत मुंबईतील खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार हे संजय राऊत असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. या घोटाळ्यात संजय राऊत यांनाही दलाली देण्यात आली, तेच या घोटाळ्याचे खरे सुत्रधार आहेत, असा दावा काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी केला आहे. करोना काळात मुंबई महानगरपालिकेने गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्यासंदर्भात उपक्रम सुरू केला होता. मात्र, ठाकरे गटाच्या नेत्यांनाच या खिचडी वाटपाचे कंत्राट दिले गेले. तसेच या घोटाळ्यात संजय राऊत यांनाही दलाली देण्यात आली, तेच या घोटाळ्याचे खरे सुत्रधार आहेत, असा दावा काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
करोना काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. महानगरपालिकेच्या खिचडी वाटपाचे कंत्राट ठाकरे गटाच्या नेत्यांना देण्यात आले होते. संजय राऊत हे खिचडी चोर असून त्यांनी त्यांची मुलगी, त्यांचे भाऊ आणि त्याचे पार्टनर यांच्या नावाने पैसे घेतले, असा आरोप संजय निरूपम यांनी केला आहे. या खिचडी वाटपाचे कंत्राट सह्याद्री रिफ्रेशमेंट नावाच्या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीत राजीव साळुंखे आणि सुजित पाटकर हे पार्टनर आहेत. सुजित पाटकर हे संजय राऊत यांच्या अगदी जवळचे मानले जातात. या कंपनीला ६ कोटी ३६ लाख रुपयांच्या खिचडी वाटपाचे कंत्राट मिळाले होते. मात्र, या कंपनीकडून संजय राऊत यांनी कुटुंबातील सदस्यांमार्फत १ कोटी रुपयांची दलाली घेतली, असा दावा संजय निरुपम यांनी करत संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
संजय राऊत यांच्या मुलीच्या खात्यात २९ मे २०२० रोजी ३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती. तसेच २६ जून २०२० रोजी ५ लाख रुपये, ७ ऑगस्ट २०२० रोजी १ लाख २५ हजार रुपये, तर २० ऑगस्ट २०२० रोजी ३ लाख रुपये जमा करण्यात आले, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली आहे.
हे ही वाचा..
काय सांगता! चक्क उंदरांनी १९ किलो गांजा आणि भांग खाल्ला!
गडचिरोली पोलीस दलाची कारवाई; दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक
‘मी गोमांस खात नाही…गर्व आहे मला हिंदू असल्याचा’!
याशिवाय संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यात ६ ऑगस्ट २०२० रोजी ५ लाख रुपये, २० ऑगस्ट रोजी १ लाख २५ हजार रुपये, तसेच सुजित पाटकर यांच्या खात्यातही अशीच रक्कम जमा करण्यात आली होती, असा लेखाजोगा संजय निरुपम यांनी मांडला आहे. तसेच या कंपनीने जोगेश्वरीमधील एका हॉटेलचे स्वयंपाकघर आपले असल्याचा दावा करून कंत्राट मिळवले होते. संबंधित हॉटेलच्या मालकालाही याची माहिती नव्हती. या कंपनीत कदम नावाची कोणतीही व्यक्ती व्यक्ती नाही. मात्र, ज्यावेळी कंत्राटसाठी अर्ज करण्यात आला, तो कदम नावाच्या व्यक्तीच्या नावे करण्यात आला होता. या कंपनीने ६.३६ कोटी रुपयांचे कंत्राट घेऊन दुसऱ्या कंपनीला दिले, असा आरोपही संजय निरुपम यांनी केला आहे.