विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने घातलेल्या छाप्यांविषयी आपले मत व्यक्त केले. त्याचवेळी कथित राम मंदिर घोटाळ्याची चौकशी व्हावी असे म्हणणाऱ्या संजय राऊतांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत यांना राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे आणि ती सुपारी राऊत वाजवत असतात’ असा सणसणीत टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
शुक्रवार, २५ जून रोजी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने छापे मारले. ईडीची ही कारवाई साऱ्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करत असून केंद्रीय तपास यंत्रणाच चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा आरोप होत आहे. यावरच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा:
देशमुख, परब ही प्यादी; खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर
मुंबई-पुण्यातील प्रसिद्ध परांजपे बिल्डर्स पोलिसांच्या ताब्यात
अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीची धाड
अनिल देशमुख यांच्यावर होणारी कारवाई ही मुंबई उच्च न्यायाल्याने दिलेल्या निर्देशानुसारच होत आहे. त्यामुळे याचे कोणतेही राजकीय अन्वयार्थ काढण्याची गरज नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर याचवेळी संजय राऊत यांनी या कारवाईवर केलेल्या टीकेला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी कथित राम मंदिर घोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी व्हावी असे मत व्यक्त केले होते. त्यालाच उत्तर देताना ‘संजय राऊत यांना राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे आणि ती सुपारी राऊत वाजवत असतात’ असा पलटवार फडणवीसांनी केला आहे. अयोध्येच्या विषयात बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांचे काही योगदान आहे का? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. ‘अयोध्येत आज राम मंदिर बनत आहे. त्यामुळे आज अनेकांच्या पोटात दुखतंय आणि ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांच्या ओठातून बाहेर येतंय’ असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.