मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
सुधाकर बडगुजर यांचा विषय महत्त्वाचा नसून त्यांचा गॉडफादर कोण? बडगुजर हे कोणाच्या मांडीला मांडी लाऊन नाशिकमध्ये फिरतात? ते कोणाची गुंतवणूक ठेवतात? तर त्याचे उत्तर आहे संजय राऊत. सुधाकर बडगुजरची चौकशी करत असताना संजय राऊतांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. १९९३ च्या बॉम्बस्फोटात ज्या दाऊदचा हात होता. त्याचा हस्तक सलीम कुत्तासोबत यांचे संबंध आता सिद्ध झाले आहेत. गुन्हा दाखल झाला आहे यावरून स्पष्ट होत आहे की, संजय राऊत हे देशद्रोही आहेत, अशी घाणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, “गेल्या अधिवेशनात दाऊदचा जवळचा हस्तक सलीम कुत्ता याच्याबरोबर एका पार्टीचा व्हिडिओ सरकारसमोर आणला होता. सलीम कुत्ता हा पेरोलवर बाहेर होता. पेरोल वर असताना तो सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करताना दिसून आला. त्यानंतर ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या पत्रकार परिषदा झाल्या. प्रत्येक पत्रकार परिषदेत आम्ही त्या गावातलेच नाहीत आणि सलीम कुत्ता याच्याशी काहीच संबंध नाहीत, असे सांगण्यात आले. ती पार्टी झाली तिथे सलीम कुत्ता नव्हता, असेही काहींनी सांगितले. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर सलीम कुत्तासोबत बडगुजरच आहे हे सिद्ध झालेले आहे,” असं नितेश राणे म्हणाले.
हे ही वाचा:
हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे सहा आमदार अपात्र!
न्यायाधीशाला योग्य प्रकारे सॅल्युट न करणे भोवले
हिंसाचार करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट, व्हिसा रद्द करणार
ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे बीसीसीआयचे वार्षिक कंत्राट रद्द
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी नाशिकचे ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सलीम कुत्ताच्या डान्स पार्टीमध्ये ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. नाशिक पोलिसांनी अखेर या प्रकरणात बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.