मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपद निवडीवरून लिहिलेल्या पत्रानंतर राज्यपालांनीही त्यावर नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे. पण तरीही राज्यपालांबद्दल डिवचणारी वक्तव्ये करण्यापासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत मागे हटण्याचे नाव घेत नाहीत. आता राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीच्या मुद्द्यावरून ठिणगी पडली असेल, असे विधान राऊत यांनी केले आहे. शिवाय, राज्यपालांवर केंद्राचाच दबाव असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणतात की, आम्ही राज्यपालांचा आदर करतो आहोत. राज्यपालांचा अनादर व्हावा असे कृत्य राज्यातील सरकारकडून, मुख्यमंत्र्यांकडून, मंत्र्यांकडून झालेले नाही. अनेकदा आम्ही त्यांना भेटतो प्रेमानं आदरसत्कार करतात, वडिलधारे आहेत. त्यांच्यावर कोण दबाव आणतो हे माहीत नाही. आम्ही तरी आणत नाही.
राऊत म्हणाले की, १२ सदस्यांच्या बाबत एक वर्षापासून प्रलंबित विषय आहे. मला वाटते तिथून ठिणगी पडली आहे. मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशी राज्यपालांनी स्वीकारायच्या असतात, असे घटना सांगते. तेव्हाही माझ्या मनात शंका आली की, महाराष्ट्राच्या राज्यपालांवर केंद्राकडून दबाव आणतंय का त्यामुळे नियुक्ती अडकवून ठेवली आहे. राज्यपालांवर दबाव आणून काम करून घेणे मान्य नाही. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या वेदनेत सहभागी आहे. केंद्राला विनंती आहे, राज्यपालांवर दबाव आणू नये.
हे ही वाचा:
बांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय?
मालेगाव बॉम्बस्फोट: योगींचे नाव घेण्यास परमबीर सिंग यांनी सांगितले
पुण्याची डॉक्टर ठरली ‘पॉवर’फुल
‘बचपन का प्यार’ फेम सहदेवचा गंभीर अपघात
राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्षाबाबत सरकारकडे परवानगी मागितली होती पण त्यांनी नाकारली. निवडणूक झाली नाही. इथे केंद्राचा दबाव आहे. आमच्याकडून नाराजी असण्याचे कारण नाही. ते आमचे पालक आहेत. त्यांनी नाराजी का व्यक्त करावी? १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांच्या मनात आहे, पण केंद्राकडून त्यांच्यावर दबाव आहे.
मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्राबाबत राऊत म्हणतात की, मुख्यमंत्र्यांनी पत्र काय लिहिले आहे हे मुख्यमंत्री सांगतील. राज्यपाल त्यांच्या पत्राबद्दल सांगतील. त्यात प्रेमाचा संवाद आहे. तो मनाला लावून घ्यायचे नाही.
राष्ट्रपती राजवटीची चर्चा कोण करते ते मूर्ख आहेत. १७० आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. अशी भाषा करत असतील तर देशाची घटना वाचून घ्यावी, असेही राऊत म्हणाले.