ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांचा जीभेवरील ताबा सुटल्याचे दिसून आले. सत्ताधाऱ्यांवर टीका करत असताना यापूर्वीही अनेकदा संजय राऊत यांनी शिवराळ आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. त्यामुळे आपण संसदीय शब्दांचा वापर करत असल्याचा दावा वारंवार करणारे संजय राऊत हे सातत्याने असंसदीय शब्दांचा वापर करत असल्याचे दिसून आल्याच्या चर्चा आहेत.
मुंबईत गुजरातच्या एका कंपनीने मराठी माणसाला नोकरी नाकारल्याचा मुद्दा समोर आला आहे. त्यावरुनचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली. “मुंबईत गुजरात स्थित एका कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करु नये अशी भूमिका घेतली. त्यावर महाराष्ट्राचे सरकार, मुख्यमंत्री जे म्हणतात आमची शिवसेना खरी, जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली ते शांत आहेत. मराठी माणसाचा आवाज राहू नये, याच कारणासाठी मोदी-शाहंनी ही शिवसेना तोडली. शिवसेना शिंदेगट ही बुळचट शिवसेना आहे. ही फडणवीसांची *** शिवसेना गप्प आहे. हिंमत असेल तर आवाज द्या नाहीतर आम्ही बघतो काय करायचं ते. काल बहुसंख्य गुजराती राहत असलेल्या घाटकोपरच्या एका सोसायटीत शिवसैनिकांना मराठी आहेत म्हणून येण्यापासून रोखलं, ही फडणवीसांची *** बुळचट शिवसेना काय करतेय?” अशा आक्षेपार्ह भाषेत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरएसएस समर्थक अधिकाऱ्याने हेमंत करकरेंना गोळी घातली असा आरोप केला होता. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “हेमंत करकरे हे शहीद झाले. ते देशासाठी लढले. ते एटीएसचे प्रमुख होते. आरएसएस आणि करेकरेंमध्ये भांडण होतं म्हणून अशा गोष्टी समोर येतात,” असं संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
‘पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; मात्र लोकांना ते विसरायला लावले’
इस्रायलने बंद केले अल जजीराचे कार्यालय!
‘भाजपला मदत करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला’
लखनऊवर विजय मिळवून कोलकाता अव्वल स्थानी!
“एटीएसने दोघांना पकडलेलं. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहीत, ते दोघे आरएसएसशी संबंधित होते. माझ्याकडे आरएसएसचे लोक यायचे. करकरेंनी चुकीची कारवाई केली म्हणून सांगायचे. कर्नल पुरोहितांच कुटुंब यायचं. करकरेंनी चुकीची कारवाई केली असं त्याचं म्हणणं होतं, त्यातून ही थिअरी समोर आली. विजय वडेट्टीवारांच नाव का घेता? व्हू किल करकरे? हे पुस्तक कोणी लिहिलय? हसन मुश्रीफ भाजपासोबत आहेत, त्यांच्या भावाने हे पुस्तक लिहिले, तेव्हा ते आयजी होते,” असंही संजय राऊत म्हणाले.