मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती टीका

मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मूतील उधमपूर येथील जाहीर प्रचार सभेत बोलत असताना ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला होता. “इंडिया आघाडीचे नेते श्रावणात मटण खातात. नवरात्रीमध्ये मासे खातात आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यामुळे त्यांच्यात मुघलांची मानसिकता आहे,” असे विधान पंतप्रधान मोदींनी केले होते. यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी इंडी आघाडीतील नेत्यांची पाठराखण केली आहे. मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का?

“नरेंद्र मोदींचे कालचे वक्तव्य ऐकले आहे का? ते पराभूत मानसिकतेतून बोलत आहेत. नरेंद मोदी असे म्हणाले की, इंडिया आघाडीचे नेते हे मुघल प्रवृत्तीचे आहेत. ते श्रावणात मटण खातात. हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का? कोण मटन खातयं, कोण चिकन खातयं, कोण फिश खातयं याचे काय करायचेय? देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर इतक्या खाली आणत असतील तर याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती वाटत आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

बंगळूरू कॅफे ब्लास्टच्या मास्टरमाइंडचे वडील होते सैन्यदलात; मुलाच्या कृत्याने दुःखी

लेबनानचा उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ला

अल्पवयीन यझिदी मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना जर्मनीत अटक

अयोध्येमध्ये राम मंदिर, जगभरात वाढता भारताचा मान!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात तेजस्वी यादव मासे खात असल्याच्या व्हिडिओवरून विरोधकांवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी म्हणाले की, “नवरात्रीत असे व्हिडिओ दाखवून कोणाला खुश करत आहात? काही लोकांना जनभावनांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते,” असं म्हणत नरेंद्र मोदींनी तेजस्वी यादव यांच्यावर टीकेची तोफ डागली. नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “श्रावण महिन्यात हे लोक आरोपीच्या घरी जाऊन मटण खातात आणि व्हिडिओ पोस्ट करतात. नवरात्रीच्या दिवसांत मांसाहाराचे व्हिडिओ पोस्ट केले जातात. जेव्हा राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण देण्यात आले तेव्हा काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या लोकांनी हे निमंत्रणही नाकारले. काँग्रेसचे लोक राम मंदिराला निवडणुकीचा मुद्दा म्हणतात. त्यांच्यासाठी हा निवडणुकीचा मुद्दा होता पण देशासाठी तो विश्वासाचा मुद्दा होता,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version