सचिन वाझे याला शिवसेना नेतृत्वाच्या आशीर्वादानेच पुन्हा पोलीस दलात घेण्यात आले होते असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीच दुजोरा दिला आहे. सचिन वाझे याला पोलिसदलात परत घेणे हे सरकारला अडचणीत आणणारे ठरेल असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आधीच दिला होता असे विधान राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्रात सध्या अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन याची हत्या या दोन अतिमहत्वाच्या केसेसचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा करत आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हा पुरता अडकला आहे. सचिन वाझे विरोधात अनेक पुरावे समोर आले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणावीस यांनी विधानसभेत आरोप करत पहिल्यांदा अंबानी स्फोटक प्रकरणातले वाझे कनेक्शन समोर आणले. एकेकाळी शिवसेना प्रवक्ता असलेल्या सचिन वाझेला शिवसेना नेतृत्वाच्या कृपाशिर्वादानेच कोविडचे कारण पुढे करत पुन्हा पोलीस सेवेत घेतले गेले. आपण मुख्यमंत्री असताना देखील वाझेला पोलीस सेवेत घेण्यासाठी शिवसेना नेते शिफारस करत असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता.
हे ही वाचा:
ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता
बेगम ममता बंगालला मिनी पाकिस्तान बनवेल
‘होला मोहल्ला’ दंगलप्रकरणात १७ जणांना अटक
वाझे प्रकरणात सुरवातीपासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांची उलट सुलट विधाने पाहायला मिळाली होती. सुरवातीला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच “वाझे हा काही ओसामा बिन लादेन नाहीये” असे म्हणत वाझेची पाठराखण केली होती. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करताना “वाझे याला परमबीर सिंह यांनी पुन्हा पोलीस दलात घेतले” असे शरद पवार म्हणाले होते. संजय राऊत यांनी देखील वाझे यांच्या शौर्याचे दाखले देत त्यांचे कौतुक केले होते. पण जसजसा वाझे यांचा पाय अंबानी स्फोटके आणि मनसुख प्रकरणात रुतत चालला आहे, तसतसे सर्वजण हात झटकत वाझेपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशाच प्रयत्नात संजय राऊत यांनी सोमवारी वाझेबद्दल विधान केले. “सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा जेव्हा निर्णय घेण्यात येत होता तेव्हाच मी शिवसेनेच्या काही नेत्यांना सांगितलं होतं. वाझेंच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकतं, असा इशारा मी तेव्हाच दिला होता” असे राऊत म्हणाले. यासोबतच “सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला धडा मिळाला आहे. एका अर्थाने अशा प्रकारची घटना घडली ते चांगलंच झालं, ज्यामुळे धडा शिकायला मिळाला” असेही राऊत यांनी म्हटले आहे. राऊतांचे हे विधान म्हणजे महाविकास आघडीच्या नेत्यांच्या आशिर्वादानेच वाझेला परत घेतल्याची अप्रत्यक्ष कबुली आहे.
दरम्यान राऊतांच्या या विधानावरून राजकारण तापताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. सचिन वाझेला पोलीस खात्यात बहाल करण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वाचाच होता या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला संजय राऊत यांनी पुष्टी देण्याचे काम केले आहे. असे अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला पोलीस खात्यात बहाल करण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वाचा होता या @Dev_Fadnavis केलेल्या आरोपाची @rautsanjay61 यांनी पुष्टीच केली आहे.
वाझेला परत आणले तर हा समस्या निर्माण करेल असा इशारा मी MVAनेतृत्वाला दिला होता असे राऊत सोमवारी म्हणाले होते. pic.twitter.com/l5pRLtv7HA— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 30, 2021