संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट
शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली पण त्यात कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती मात्र त्यांनी उघड केली नाही. त्यामुळे आता शिवसेनेची वाटचाल संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे यूपीएच्या दिशेने सुरू झाली आहे, असे म्हटले जात आहे.
राहुल गांधी यांची भेट झाल्यावर संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आमच्यात थोडीफार चर्चा झाली. देशात यूपीए मजबूत संघटन आहे. हे उद्धव ठाकरेंचंही मत आहे. शरद पवारांचंही मत आहे. देशाला सध्या समर्थ आघाडी आणि एकच आघाडी हवी आहे. वेगवेगळ्या आघाड्या कशाला हव्यात? अनेक प्रमुख नेत्यांचं ते मत आहे.
संजय राऊत यांनी सांगितले की, आम्ही जरी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार चालवत आहोत. मी सकाळीच सांगितलं महाराष्ट्रातील आघाडी ही मिनी यूपीए आहे. त्याचं एक महत्त्व असतं. या देशात एनडीए यूपीए फ्रंट वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होतो. आम्ही एनडीएत होतो त्यातही भिन्न विचारांचे लोक होते. हिंदुत्वाला विरोध करणारे नेते व पक्षही एनडीएत होते. अटलजींच्या नेतृत्वाखाली समान नागरी कायदा, राममंदिर काही काळ बाजुला ठेवावा लागला होता. किमान समान कार्यक्रमावर काही विषय बाजुला ठेवावे लागतात.
हे ही वाचा:
नवाब मलिक यांना न्यायालयाने फटकारले
राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; पोस्टरवरून फोटो गायब
‘डॉक्टर आणि परिचारिकांना सौजन्याने वागण्याचे, ध्यानधारणेचे प्रशिक्षण द्या’
केरळमध्ये ‘मैं बाबरी हूँ’ बिल्ले वाटून मुलांमध्ये पसरवत आहेत द्वेष
या आघाडीला कोणता चेहरा असेल यावर बोलताना संजय राऊत म्हणतात की, तो कोणता याबद्दल उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका अनेकवेळा मांडली आहे, शरद पवारही म्हणाले की, आधी समर्थ पर्याय हवा मग नेता ठरवता येईल.
राहुल गांधी यांच्याशी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली याबद्दल ते म्हणाले की, राहुल गांधींशी अनेक विषयांवर चर्चा झाली. पण त्याचा गोषवारा उद्धवजींच्या कानावर आधी घालेन त्यांनी परवानगी दिली तर बोलेन. यूपीत जाणार की नाही ते २४ तासांत सांगेन. प्रियांका गांधी यांच्याशीही भेट घेणार आहे, असेही राऊत म्हणाले.