ठाकरे सरकारचे वनमंत्री संजय राठोड याच्या राजीनाम्यासाठी आता भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. संजय राठोड याचा राजीनामा घेतला नाही तर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असंही भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आता संजय राठोडही कोरोनाबाधित होणार का? असाही सवाल केला जात आहे.
विरोधीपक्षांकडून संजय राठोड याच्या राजीनाम्यासाठी जोरदार मागणी केली जात आहे. विधिमंडळात देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये याच मुद्यावरून जोरदार धुमश्चक्री होणार आहे. अशावेळी राजकीय समस्यांचा तोडगा काढण्यासाठी कोरोनाचे कारण दाखवून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंनी, सर्व सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आंदोलनांवर, यात्रांवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या विरोधात सध्या विरोधीपक्ष आक्रमक होत आहे. धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्यासारख्या मंत्र्यांची अनेक ‘प्रकरणं’ जनतेसमोर येत आहेत. या सर्व प्रकरणांमुळे कोणत्याही मंत्र्याला आजवर राजीनामा द्यावा लागलेला नाही. ठाकरे सरकारने अशा सर्वच मंत्र्यांना पाठीशी घातले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये आता सरकारवर दबाव वाढून या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी चिन्ह होती. परंतु राजकीय मोर्चांवर बंदी घालून आता उद्धव सरकारने या मंत्र्यांची चिंता दूर केली आहे.
त्यामुळे आता, “पूजा चव्हाणच्या आत्महत्त्येचं प्रकरण बाहेर आल्यानंतर बरेच दिवस संजय राठोड तोंड लपवत फिरत होते. आता अधिवेशनाच्या काळातही त्यांना कोरोना होऊन ते कॉरंटाईन झाले तर आम्हाला नवल वाटणार नाही.” असे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले.