ठाकरे सरकारचे तोंड काळे करून संजय राठोडचा राजीनामा

ठाकरे सरकारचे तोंड काळे करून संजय राठोडचा राजीनामा

महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड याने अखेर राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर तब्बल २१ दिवसांनी त्याने राजीनामा दिला आहे. संजय राठोड याच्यामुळे ठाकरे सरकारचे तोंड चांगलेच काळे झाले आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात त्याचे नाव आल्यामुळे त्याच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याने आपला राजीनामा सुपूर्त केला असल्याचे समजते.

मुख्यमंत्री ठाकरे हे संजय राठोड प्रकरणात कोणतीही कठोर कारवाई न करता सावधगिरीची भूमिका घेताना दिसत होते. संजय राठोड प्रकरणात पहिलीच प्रतिक्रिया देताना “महाराष्ट्रात उगाच बदनामी करायचे प्रकार सुरु आहेत” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. यावरूनच ठाकरे सरकार राठोडला पाठीशी घालून त्याच्या कृत्यांवर पांघरूण घालण्यास सज्ज असल्याचे म्हटले जात होते. या विषयात साधा एफआयआरही दाखल न होणे हा त्याचाच भाग असल्याचे म्हटले जात आहे. परंतू राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडून हा विषय चांगलाच लावून धरला गेला होता. मृत पूजाला न्याय मिळावा यासाठी भाजपा आक्रमक झाला होता. संजय राठोड याचा राजीनामा घेतला गेला नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत होता. विरोधी पक्षाच्या या दबावामुळेच राठोडना राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा रंगली आहे.

१ मार्च पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशीच संजय राठोडने राजीनामा दिला आहे. पण तरीही विधिमंडळात संजय राठोड विषयावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाण या मूळच्या बीडच्या असणाऱ्या तरुणीचा ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात मृत्यू झाला. पूजा चव्हाण प्रकरणात सुरुवातीपासूनच वनमंत्री संजय राठोड याचे नाव येत होते. कालांतराने राठोड याच्या पूजासोबतच्या संभाषणाच्या ध्वनिफितीही व्हायरल झाल्या होत्या.

या प्रकरणात नाव आल्यापासून गायब असलेले महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड काही दिवसांपूर्वी अचानक सकाळी प्रकट झाले आणि शक्तिप्रदर्शन करत आपली रडकथा संगीतली. कोविडचे नियम धाब्यावर बसवून दहा हजारांची गर्दी जमवत सरकारवर दबाव आणायचा प्रयत्न राठोडने केला होता. पण आक्रमक विरोधकांसमोर त्याचे हे प्रयत्न फोल ठरले.

Exit mobile version