गायब संजय राठोड प्रकटला, पोहरागडावर शक्तिप्रदर्शन!

गायब संजय राठोड प्रकटला, पोहरागडावर शक्तिप्रदर्शन!

महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आपले मौन सोडले आहे. पूजा चव्हाण हीचा मृत्यू दुर्दैवी असून तिच्या मृत्यूचे दुर्दैवी राजकारण सुरु असल्याचे राठोडने म्हटले आहे.

पूजा चव्हाण या मूळच्या बीडच्या असणाऱ्या तरुणीचा ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात मृत्यू झाला. पूजा चव्हाण प्रकरणात सुरुवातीपासूनच वनमंत्री संजय राठोडचे नाव येत होते. कालांतराने राठोडच्या पूजासोबतच्या संभाषणाच्या ध्वनिफितीही व्हायरल झाल्या होत्या. या प्रकरणात नाव आल्यापासून गायब असलेले महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड हे मंगळवारी सकाळी प्रकट झाले. बंजारा समाजाचे आराध्यदैवत असणाऱ्या पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी संजय राठोड वाशिम जिल्ह्यात पोहोचला. यावेळी राठोडच्या समर्थकांकडून कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. राठोड आपल्या कुटुंबियां समवेत अनेक गाड्यांचा ताफा घेऊन पोहरादेवीच्या दर्शनासाठी गेले. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात असून देखील हजारो कार्यकर्त्यांनी रठोडच्या समर्थनार्थ गर्दी केली. गर्दी अनावर झाल्याने पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. पोहरादेवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर राठोडने माध्यमांशी संवाद साधला आणि पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आपले मौन सोडले.

हे ही वाचा:

पूजा चव्हाणच्या नातेवाईकाकडून सीबीआय चौकशीची मागणी

संजय राठोड नेमके काय म्हणाले?
गौर बंजारा समाजातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यात दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या कुटुंबाच्या दुःखात माझे कुटुंब आणि माझा समाज सहभागी आहे. पण दुर्दैवाने तिच्या मृत्यूचे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात होत आहे. मला उध्वस्त कारण्यासाठी हे राजकारण सुरु असल्याचे राठोडने म्हटले आहे. मी मागासवर्गीय समाजातून येतो. भटक्या विमुक्त समाजासाठी काम करत आहे. मी ओबीसींचा नेता आहे. पण मला आणि माझ्या कुटुंबाला उध्वस्त करण्यासाठी हे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे. माध्यमांवर माझ्या बाबतीत जे काही दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, जे काही व्हायरल होत आहे त्यात काही एक तथ्य नाही असेही राठोड म्हणाला.

मुख्यमंत्र्यानी चौकशी लावली आहे!
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांचा तपास सुरु आहे. तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होऊन सत्य बाहेर येईल. पण तोवर आपली आणि आपल्या समाजाची बदनामी थांबवावी असे राठोडने माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान मधल्या कालावधीत आपण कुठेही गेलो नसून कुटुंबाला सावरत असल्याचा खुलासा राठोडने केला आहे. “मी माझ्या कुटुंबाला सावरत होतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. माझी आई वृद्ध आहे. त्यांना सावरत होतो. मुंबईच्या कार्यालयातून माझे काम सुरु होते” असे स्पष्टीकरण राठोड यांनी दिले आहे.

आज मी इथे एका पवित्र ठिकाणी आलो आहे. मी या गडावरून माझी भूमिका मांडत आहे. लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखे कमला लागीन असेही राठोड यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version