“खिचडी चोराचं काम करणार नाही”

ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा संताप

“खिचडी चोराचं काम करणार नाही”

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. अशातच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने बुधवार, २७ मार्च रोजी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. ठाकरे गटाने यादीमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातही उमेदवार उभे केल्याने काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त करत शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे.

आठवड्याचा अल्टिमेटम अन्यथा अनेक पर्याय खुले- संजय निरुपम

काँग्रेस नेते संजय निरुपम हे मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. अमोल किर्तीकर यांच्या नावाची या जागेसाठी चर्चा होती. अखेर त्यांच्या नावाची या जागेसाठी घोषणा झाल्याने संजय निरुपम यांचा पत्ता कट झाला आहे. परिणामी संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाने काँग्रेसवर अन्याय केला आहे, असं संजय निरुपम म्हणाले. “काँग्रेसच्या नेतृत्त्वाला सांगू इच्छितो की, येत्या आठवड्याभरात वाट पाहीन. अनेक पर्याय खुले आहेत. जे काही होईल, ते आरपार होईल. त्यांच्या मनात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्या ऐकण्यासाठी एक आठवड्याची वाट पाहिली जाईल”, असा इशारा संजय निरुपम यांनी काँग्रेसला दिला आहे.

ठाकरे गटासारख्या कमी जनाधार असलेल्या पक्षासमोर काँग्रेस झुकली

“काँग्रेसच्या नेतृत्त्वाने नेहमीच भ्रष्ट्राचाराविरोधात आवाज उठवला आहे. परंतु, ज्या उमेदवारावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्याच उमेदवाराला ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला हे दिसलं नाही का? त्यांनी खिचडी सप्लायरकडून दलाली घेतली आहे. अशा उमेदवाराला आमच्यावर थोपवलं आहे. मी खिचडी चोराचं काम करणार नाही,” असा संताप संजय निरुपम यांनी व्यक्त केला आहे. “वरिष्ठ नेतृत्त्वांकडून माझी अपेक्षा होती की २०१९ ला निवडणूक हरल्यानंतर मी माझ्या मतदारसंघात सक्रिय आहे. त्यामुळे या जागेवरून निवडणूक लढवण्याचा मला अधिकार आहे. ठाकरे गटाने आम्हाला दाबलं आणि आम्ही दबले गेलो. ठाकरे गटाचे स्वतःचं काही अस्तित्व नाही त्यांच्यासमोर आम्ही झुकले आहोत. स्वबळावर ठाकरे गट एकही उमेदवार निवडणून आणू शकत नाही आणि अशा कमी जनाधार असलेल्या पक्षासमोर काँग्रेसने झुकणं हे श्रद्धांजली लिहिण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे, असं दिसतंय,” असं म्हणत संजय निरुपम यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

एकेकाळी मुंबईतील सहाही जागांवर काँग्रेसचं प्राबल्य होतं, तिथे आज जर पक्षाच्या वाट्याला केवळ एक जागा येत असेल तर हा मुंबईतील काँग्रेसचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला जात आहे, याचा विचार व्हायला पाहिजे, असा आरोपही संजय निरुपम यांनी केला आहे.

हे ही वाचा:

वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित

ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स

रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन

वॉशिंग मशिनमध्ये नोटांची थप्पी; ईडीने छाप्यात जप्त केले २.५४ कोटी रुपये

काँग्रेसच्या नेतृत्त्वाला पक्षाची चिंता राहिलेली नाही

“पक्षाच्या नेतृत्त्वाला पक्षाची चिंता राहिलेली नाही. गेल्या १५-२० दिवसांपासून माझी कोणाशीही चर्चा झाली नाही. ज्याला जे करायचं आहे ते त्याने करावं, असं समजून कोणीही कसंही वागतं आहे. माझा मुद्दा असा आहे की, संपूर्ण देशात काँग्रेसने न्यायावर आधारित एक घोषणापत्र जाहीर केलं आहे. पण दुसरीकडे पक्षातील कार्यकर्त्यांवर न्याय मिळतोय की नाही याची चिंता राहिलेली नाही,” असं म्हणत संजय निरुपम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

Exit mobile version