पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम लागला असून भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संग्राम थोपटे हे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करणार आहेत. आज (२० एप्रिल) त्यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन त्यांची बाजू ऐकली आणि हा निर्णय घेतल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले.
यावेळी बोलताना संग्राम थोपटे म्हणाले, विधानसभा अध्यक्षपद एक वर्षाहून अधिककाळ रिक्त होते त्यानंतरही महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी आशा होती. पण सेवाजेष्ठतेचा विचार करून पक्षनेतृत्वाने निर्णय घेतले. पण आता कार्यकर्त्यांची भावना आहे की सलग तीन वेळा मोठ्या शक्तींच्या विरोधात निवडून येवून देखील तुम्हाला राजकीय ताकद दिली जात नाही. त्यामुळे विकासकामांनाही खोडा लागत आहे.
म्हणून आता आपल्याला बदलाचा निर्णय घेतला पाहिजे असे कार्यकर्त्यांच म्हणण आहे. आपल्याला डावललं जात आहे. अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु शेवटी तालुक्याच्या भवितव्याचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आहे असे थोपटे यांनी सांगितले.
हे ही वाचा :
तस्लिमा नसरीन संतापल्या, मोहम्मद युनूसना हाकला!
चालत्या गाडीत बलात्काराला विरोध केल्याने ब्युटीशियनची हत्या!
‘बंगाली हिंदूंना वाचवा’, सुरक्षेसाठी परवानाधारक शस्त्रे द्या!
दरम्यान, संग्राम थोपटेंच्या राजीनाम्याने पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे ही काँग्रेसचे आमदार होते. जनसंपर्कही त्यांचा दांडगा होता. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात थोपटे यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला होता. परंतु आता त्यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन कमकुवत होण्याची शक्यता आहे.