महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा दणका मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. संग्राम थोपटे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. समर्थकांचा मेळावा घेऊन संग्राम थोपटे याबाबतची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
संग्राम थोपटेंच्या राजीनाम्याने पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे ही काँग्रेसचे आमदार होते. जनसंपर्कही त्यांचा दांडगा होता. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात थोपटे यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला होता. परंतु आता त्यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन कमकुवत होण्याची शक्यता आहे.
भोर-वेल्हे-मुळशी या विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या संग्राम थोपटे यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला होता. यानंतर संग्राम थोपटे हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संग्राम थोपटे यांचे नाव विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी घेतले जात होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते, मात्र आघाडीतील अन्य पक्षांचे एकमत होत नसल्याने थोपटे यांची संधी हुकली.
हेही वाचा..
“बांगलादेशला जाण्यापूर्वी पुनर्विचार करा!” ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकांना का दिला इशारा?
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वलसांगकर यांची आत्महत्या
बीएचयूच्या हिंदी विभागावर एबीव्हीपीचा काय आरोप?
पश्चिम बंगालमध्ये हिंदू शरणार्थी झाले आहेत, सर्वत्र दादागिरी
दरम्यान, भाजपचे दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी मध्यस्थी करत थोपटे यांचे भाजप नेतृत्वाशी बोलणे करून दिल्याची माहिती समोर आली असून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी केलेल्या चर्चेनंतरच संग्राम थोपटे यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.