गेले १५ दिवस ‘नाॅट रिचेबल’ असणारे वनमंत्री संजय राठोड मंगळवारी सकाळी यवतमाळ येथे त्यांच्या घरी पोहोचले आहेत. वाशिम येथील पोहरादेवीच्या दर्शनासाठी राठोड जाणार आहेत. पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी नाव जोडले गेल्यानंतर आज पहिल्यांदाच राठोड माध्यमांसमोर येणार आहेत. त्यामुळे संजय राठोड आपले मौन सोडून पूजा चव्हाण प्रकरणावर काही बोलणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
वनमंत्री संजय राठोड यांच्या शासकीय कार्यक्रमानुसार ते सकाळी साडे अकराच्या सुमारास पोहरागड येथे पोहोचणार आहेत. संजय राठोडच्या या कार्यक्रमात खूप मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. संजय राठोड समर्थकांनी त्याच्या स्वागताचे होर्डिंग्स लावले आहेत, तर राठोडाच्या समर्थनार्थ जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे संदेश समाजमाध्यमांवरून फिरत आहेत. त्यामुळे कोविड नियमावली पायदळी तुडवून मंत्री महोदयांचे शक्ती प्रदर्शन होणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
हे ही वाचा:
रिक्षा-टॅक्सी भाडेवाडीचा संबंध पेट्रोल दरवाढीशी नाही…ते आधीच ठरले होते
दरम्यान पोलिस प्रशासनाकडून पोहरागड परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पोहरागड परिसरात बाँम्बशोधक पथकाची गाडी दाखल झाली आहे. तर एकीकडे रस्त्यावर बॅरिकेट्स टाकण्याचे काम सुरू आहे. गर्दी जमल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकाडून सर्व खबरदारी घेतली जात आहे.
संजय राठोडांसाठी होमहवन
वनमंत्री संजय राठोडांवरचे संकट टळावे यासाठी पोहरादेवी मंदिरात होमहवनाचे आयोजन करण्यात आले आहे. पोहरादेवी मंदिराच्या महंतांनी सपत्नीक या होमाचे आयोजन केले आहे. पोहरादेवी हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत आहे.