मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाला राज्यात चांगलाच राजकीय रंग चढल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन काल (२४ ऑक्टोबर) खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीची पोलखोल केली. या पार्श्वभूमीवर आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक पत्र लिहिले आहे. ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, असा आरोप वानखेडे यांनी या पत्रात केला आहे. त्याचबरोबर माझ्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, अशी मागणीही वानखेडे यांनी केली आहे.
समीर वानखेडे यांनी पत्रात मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवले जात असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही व्यक्तीचे नाव न लिहिता त्यांनी मोठ्या पदावरील लोक नोकरीवरून बडतर्फ करण्याची आणि तुरुंगात टाकण्याची धमकी देत असल्याचे म्हटले आहे. चुकीच्या आरोपांमुळे माझ्यावर कुठलीही कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी वानखेडे यांनी केली आहे.
हे ही वाचा:
… म्हणून त्याने मारली राज्यपालांच्या कानशिलात!
नाशिकमधील शिवसैनिकांना पडला उद्धव ठाकरेंचा विसर!
कुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा
समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते… क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा
संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओनंतर उठलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी पोलिस महासंचालकांना हे पत्र लिहिले आहे. व्हिडीओ शेअर केल्यावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ड्रग्स प्रकरणात एनसीबीवर टीका केली होती. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात स्यूमोटो कारवाई करायलाच हवी, असेही ते म्हणाले. नवाब मलिक यांनीही या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
एनसीबीचे अधिकारी मुठा अशोक जैन यांनीही सर्व प्रकरणावर भाष्य करणारे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी एनसीबीची भूमिका मांडली आहे. ‘आर्यन खान ड्रग्स प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणावर सध्या न्यायालयात खटला सुरु आहे. तसेच या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईल यांना काही मत मांडायची होती, तर त्यांनी ती सोशल मिडीया ऐवजी न्यायालयात मांडायला हवी होती. त्यांनी सोशल मिडीयावर काही लोकांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खंडण केले आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी आणि तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र एनसीबीच्या डायरेक्टरांकडे पाठवत असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल’, असे एनीसीबीच्या प्रसिद्धीपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.