‘वानखेडे यांनी धर्मांतर केल्याचे दिसत नाही’

‘वानखेडे यांनी धर्मांतर केल्याचे दिसत नाही’

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांचे मत

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे आपल्याविरोधात छळवणूक सुरू असल्याची तक्रार केल्यानंतर या आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी वानखेडे यांचा आत्मविश्वास वाढविणारे वक्तव्य केले आहे.

हलदर यांनी म्हटले आहे की, वानखेडे यांनी धर्मांतर केले आहे, असे सकृतदर्शनी दिसत नाही. हलदर यांच्या या वक्तव्यामुळे वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष हलदर यांची भेट वानखेडे यांनी शनिवारी घेतली. जवळपास तासभर ही चर्चा झाली. त्यात वानखेडे यांनी विविध कागदपत्रे, जातप्रमाणपत्रे सादर केली. शिवाय, आपले एक निवेदनही त्यांनी सादर केले. त्यानंतर त्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर हलदर यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.

वानखेडे यांच्यावर महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक हे गेले काही दिवस आरोपांची मालिका चालवत आहेत. त्याविरोधात वानखेडे यांनी ही तक्रार दाखल केली होती. जातीवरून आपला छळ केला जात असल्याची ही तक्रार आहे. या भेटीदरम्यान वानखेडे यांना विचारण्यात आले की, ते शेड्युल कास्टचे आहेत का, त्यावर वानखेडे यांनी हो म्हणून सांगितले आणि त्यासंदर्भातील पुरावेही सादर केले. वानखेडे हे सुशिक्षित आहेत आणि ते कायदा जाणतात. त्यांच्या जातीसंदर्भात कुणी तक्रार केल्यास आम्ही त्याची चौकशी करणार असल्याचेही हलदर म्हणाले. महाराष्ट्र सरकार यासंदर्भात काय करणार हे आम्ही पाहू आणि नंतर राष्ट्रीय मागासवर्ग आपले काम करील, असेही ते म्हणाले.

 

हे ही वाचा:

मुख्यमंत्रीजी, पेन्शन नाही, निदान आत्महत्या तरी करू द्या!

पंतप्रधान मोदींनी दिले पोप फ्रान्सिस यांना ‘हे’ निमंत्रण

… वरळीतले मच्छिमार म्हणताहेत, बंद करा कोस्टल रोड!

माझ्या जीवाला नवाब मलिकांपासून धोका…मोहित कंबोज यांची तक्रार

 

वानखेडे यासंदर्भात म्हणाले की, मी मागासवर्गीय आयोगाच्या उपाध्यक्षांना भेटायला आलो आहे. त्यांच्याशी चर्चा करून कागदपत्रे सादर केली आहेत.

Exit mobile version