काँग्रेसची औरंग निष्ठा…

काँग्रेसची औरंग निष्ठा…

काँग्रेस पक्ष घसरणीचा रोज नवा टप्पा गाठतोय परंतु तारु बुडत असूनही पक्षाला केलेल्या चूका सुधारण्यात रस दिसत नाही. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद नामांतरला कडाडून विरोध करत यावर नव्याने शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसचा बुडता पाय खोलात जातोय.

हिंदू दहशतवादाचा मुद्दा काढून काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तोंड फोडून घेतले. काँग्रेस हा हिंदू विरोधी पक्ष असल्याचा भाजपाच्या दाव्यावर मतदारांनी ईव्हीएमद्वारे मोहोर उमटवली. काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पक्षाचा हिंदूविरोधी चेहरा हे पराभवाचे महत्वाचे कारण ठरल्याचा निष्कर्ष पक्ष धुरीणांनी काढला. परंतु हा निष्कर्ष काढल्यानंतर काँग्रेसमध्ये वैचारीक ओढाताण सुरू झाल्याचे चित्र आहे.

पुन्हा सत्तेत यायचे असेल तर पक्षाला लागलेला हिंदूविरोधाचा कलंक पुसणे गरजेचे आहे हे नेतृत्वाच्या लक्षात आले. त्यासाठी कसरत सुरू झाली. काँग्रेस नेते राहुल गांधीनी जानवे घालून दत्तात्रय गोत्र स्वीकारले, मंदीरांचे दौरे आणि पूजा-अनुष्ठाने सुरू झाली. पुरोगामीपणा खुंटीला टांगून राहुल गांधी हे पंडीत असल्याचे पक्षाचे प्रवक्ते जाहीरपणे सांगू लागले.

परंतु एकाबाजूला पक्षाच्या चेह-यावर ही रंगरंगोटी सुरू असताना तुष्टीकरणाच्या जडलेल्या सवयीतून या मेहनतीवर पाणी ओतले जात असल्याचे चित्र आहे. हिंदूविरोध हा काँग्रेस पक्षाच्या चारीत्र्यामध्ये खोलवर भिनलेला. या मूळ प्रवृत्तीची उबळ त्यांना अध्येमध्ये येतच असते.. जानवेधारी भूमिकेत शिरल्यानंतर हिंदूना खूष करण्याच्या नादात हक्काची व्होट बँक नाराज  होण्याची शक्यता होती. या पेचामुळे काँग्रेसची कसरत सुरू झाली. एका राज्यात एक भूमिका आणि दुस-या राज्यात भलतीच, असे प्रकार सुरू झाले. अलिकडेच उत्तर प्रदेशातील गोवंशासाठी प्रियांका गांधी यांनी आवाज उठवला तेव्हा सोशल मीडियावर लोकांनी त्यांना वायनाडमध्ये भररस्त्यावर कापलेले गायीचे वासरू आणि त्या वासराच्या मासांची बिर्याणी खाणा-या काँग्रेस कार्यकर्त्यांची आठवण करून दिली. ‘हिंदू विरोधी’ शिक्का पुसताना महाराष्ट्रात मात्र काँग्रेस पुन्हा परंपरागत मतपेढीवर लक्ष देते आहे.

महारष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान  घडामोडी घडताना दिसतायत. कधी काळी ज्वलंत हिंदूत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना  काँग्रेसच्या कडेवर बसून सत्तेचे सोपान चढली. शिवसेनेचे नेतृत्व सध्या अजान स्पर्धा भरवून काँग्रेसच्या परंपरागत व्होट बँकेत वाटेकरी होण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे सावध झालेल्या काँग्रेसने इथे मात्र वरकरणी स्वीकारलेले जानवे खुंटीला टांगून परंपरागत व्होट बँकेची मशागत सुरू केली आहे. बिहार निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवेसी याच्या एमआयएम या पक्षाने मारलेली मुसंडी लक्षात घेऊन काँग्रेस महाराष्ट्रात सजग झाली आहे. इथेही ओवेसी मुस्लीम व्होटबँकवर डल्ला मारू शकतात याची पूर्ण कल्पना महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे काँग्रेस नेते नव्या दमाने कट्टरवाद्यांच्या दाढ्या कुरवाळू लागले आहेत. बाळासाहेब थोरात यांच्यासारखा नेमस्त नेता औरंगाबादच्या नामांतरप्रकरणी सलग ट्वीट करून शिवसेनेला खडसावतो,  नामांतराच्या विरोधात इतकी कठोर भूमिका घेतो त्यामागची पार्श्वभूमी ही आहे.

औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर करण्याची शिवसेनेची जुनी मागणी आहे. छत्रपती संभाजी राजांनी इस्लामचा स्वीकार करावा म्हणून औरंगजेबाने त्यांचा अमानुष छळ केला. त्या छळाला दाद न देता राजांनी स्वधर्मासाठी बलिदान केले. हे बलिदान महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. महाराजांच्या छळाच्या जखमा हिंदूंच्या मनात आजही ठसठसतायत. मुघलांच्या या जिहादी बादशहाने काशी विश्वेश्वराचे मंदीर फोडले. अनेक मंदीरांचे कळस धुळीला मिळवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुर्कांच्या विरोधात तलवार रोखत हिंदवी स्वराज्याचा डाव मांडला होता. त्यांच्या पश्चात हे स्वराज्य धुळीस मिळवण्यासाठी औरंगजेब स्वत: महाराष्ट्रात आला. २७ वर्षे मुघलांच्या फौजा मराठी मुलख उद्धवस्त करत फिरत होत्या. परंतु औरंगजेबाचे मनसुबे सफल झाले नाही. महाराष्ट्राच्या मातीत तो त्याच्या जिहादी इराद्यांसह गाडला गेला. औरंग्या आटोपला तेव्हा समर्थ रामदासांना कोण आनंद झाला. बुडाला औरंग्या पापी, हिंदुस्तान बळावले… या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. या भावला अवघ्या हिंदुस्तानच्या होत्या, अवघ्या महाराष्ट्राच्या होत्या.

अशा महाराष्ट्र द्वेष्ट्या बादशहाची तळी काँग्रेसचे नेते उचलतायत. अशा हिंदूद्रोही जिहादी बादशाहाचे नाव महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याला असणे हा महाराष्ट्रावर लागलेला कलंक असून छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाचा अपमान आहे. हा कलंक धुवून काढणे ही हिंदू समाजावर इतिहासाने सोपवलेली जबाबदारी आहे. हिंदू समाजाबाबत आकस बाळगणा-या काँग्रेसला या अपमानाची सल असण्याचे काहीच कारण नाही. इटालियन नेतृत्वाला धर्माभिमानी छत्रपतींबद्दल ममत्व असणे शक्यच नाही. त्यांच्या निष्ठा बाबराच्या खानदानाशी जोडलेल्या आहेत. देशासाठी रक्त सांडणा-यांना पाण्यात पाहण्याचा नेहरू-गांधी-मायनो आणि वाड्रा घराण्याचा इतिहास आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांसारखा काँग्रेस नेता औरंगाबादच्या नामकरणाला विरोध करतो हे त्यांच्या पक्षाच्या प्रवृत्तीला धरून आहे. सत्तेसाठी मिंधी झालेली शिवसेना मूग गिळून हा तमाशा पाहाते आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयकडून ट्वीटरवर संभाजीनगरचा उल्लेख होता, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दम भरल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून नाक मुठीत धरून हा संभाजीनगरचा उल्लेख चुकून झाल्याचा खुलासा करण्यात येतो. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना संभाजीनगरचा उल्लेख करण्याची चोरी झाली आहे.

औरंगाबाद नामांतराच्या निमित्ताने जे घडतंय ते चांगलेच आहे. मुस्लीम मतांसमोर काँग्रेसला हिंदूंच्या भावनांची मातब्बरी वाटत नाही असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. दत्तात्रय गोत्रवाल्यांचे खरे रुप चेहरा लोकांना दिसते आहे. शिवसेनेचा लाचार चेहरा लोकांच्या समोर येतोय. भाजपासोबत सत्तेत असताना वाघाचे अवसान दाखवणारी शिवसेना काँग्रेससमोर एका गरीब शेळीसारखी गुपगुमान आहे.

महाराष्ट्रातले ज्वलंत हिंदुत्ववादी इटालियन कळपात शिरल्यानंतर राज्यात देव, देश आणि धर्मासाठी बलिदान करणा-या छत्रपती संभाजी राजांचे नाव महाराष्ट्र तळपणार की जिहादी

 

औरंगजेबाचे असा सवाल निर्माण झाला आहे.

Exit mobile version