मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे यांचे आझाद मैदानात उपोषण

मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे यांचे आझाद मैदानात उपोषण

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आजपासून मुंबई येथील आझाद मैदान येथे मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. मराठी आरक्षणविषयी राज्यसरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून तरुण मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्यातील विविध मराठा संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यात आणि आंदोलनात सहभागी होणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

” सरकारने दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे पर्याय उरलेला नाही, म्हणून मराठा समाजाच्या पाच मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसलो आहोत. माझे आंदोलकांना एकच सांगणे आहे की, आंदोलन शांततेत पार पाडावे. असे संभाजीराजे यांनी आंदोलन सुरु होण्यापूर्वी पत्रकार परीषदेत सांगितले आहे.

पुढे ते म्हणाले, ” २००७ पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजही वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली आहे. ५ मे २०२१ ला आरक्षण रद्द झाले .मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली आहेत. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण केलेली नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे. सोबतच त्यांनी सरकारला आपल्या मागण्यांविषयी आठवण करून दिली आहे.

हे ही वाचा:

युक्रेन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत तटस्थ

काय घडतंय युक्रेनमध्ये?

पाकिस्तान लष्करात दोन हिंदू अधिकारी

पुतीनना भेटलात, मग भोगा कर्माची फळे

संभाजी राजे यांच्या मागण्या काय आहेत?

१. मराठा समाजाला आरक्षण मिळावे.
२. मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची देखील अंमलबजाणी करण्यास तत्काळ सुरूवात करून, लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी.
३. ईसीबीसी व एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या, पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे, त्याच पदावर कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी.
४. सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करुन सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे आणि येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी.
५. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रूपये कर्ज व्याज परतावा हा २५ लाख रुपये करण्यात यावा.

Exit mobile version