अजित पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या पर्यायाविषयी सूतोवाच केले होते. मात्र, आता हा पर्याय पूर्णपणे बाजूला सारण्यात आला आहे. तेव्हा अजित पवार यांनी मराठ्यांचा घात करु नये, असे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहल्याची बातमी आली. पुन्हा एकदा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. माननीय गायकवाड आयोग स्वीकारुन सरसकट ओबीसी समावेश जे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे त्या विकल्पाकडे ठरवून दुर्लक्ष करून केंद्राकडे बोटं दाखवून हात झटकण्याचा घृणास्पद प्रकार मुख्यमंत्री करत आहेत. ज्या व्यक्तीने कधीही शब्द बदलला नाही अशा बाळासाहेबांचे ते वारस आहेत, परंतु सध्या बारामतीची हवा त्यांना जरा जास्तच मानवलेली दिसतेय, गोड बोलणे आणि पाठीत सुरी घोपासने, अशी टीका सौरभ खेडेकर यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
हे ही वाचा:
२-१८ वयोगटातील मुलांसाठी होणार लसीची चाचणी
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार?
अरबी समुद्रावर घोंगावते आहे वादळ
सीईटीच्या तारखा बारावीच्या परिक्षेनंतर घोषित होणार
गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याबाबतच राज्यपालांना भेटलो. निकालामध्ये म्हटलंय आरक्षणाचा अधिकार राज्याचा नाही तर केंद्राचा आहे. त्यामुळे आम्ही केंद्राला आणि राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांनी आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचू, असं सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीसांचा कायदा फुलप्रूप असता, तर आज राज्यपालांना भेटायला यावं लागलं नसतं. आज आम्ही पत्र दिलं आहे, त्याचं उत्तर काय येतं ते पाहू. त्याची प्रतीक्षा जनतेला आहे. राज्यपालही सहमत आहेत. त्यांनी पत्र वेळेत पोहोचवण्याचं आश्वासन दिल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.