पंढरपुरात कमळ फुलले
एकीकडे देशात पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालांकडे सगळ्यांचे लक्ष असताना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना ३७१६ मतांनी पराभूत करत जोरदार हादरा दिला आहे. दोन्ही उमेदवारांनी लाखभर मते मिळविली पण सुरुवातीपासून घेतलेली आघाडी आवताडे यांनी सोडली नाही. आवताडे यांनी या निवडणुकीत १ लाख ९४५० मते मिळविली तर भालके यांच्या खात्यात १ लाख ७७१७ मते मिळाली. या विजयामुळे भाजपाने तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला धोबीपछाडच दिला आहे. या विजयामुळे प्रथमच पंढरपूरमध्ये कमळ फुलले आहे.
एक पाऊल पुढे टाका, भाजपा हाच एकमेव पर्याय आहे
पश्चिम बंगाल निवडणुकीने घेतली प्रशांत किशोर यांची विकेट
समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा निसटता विजय
भारत भालके यांचे करोनामुळे निधन झाल्यानंतर तिथे पोटनिवडणूक लागली. भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. तेव्हापासून भाजपा आणि महाविकास आघाडीत या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. महाविकास आघाडीच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंत पाटील यांनी भालके यांच्यासाठी जोरदार प्रचारमोहिम राबविली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते अनेक दिवस तळ ठोकून होते. दुसरीकडे भाजपा नेत्यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आवताडे यांच्या प्रचाराची धुरा वाहिली. त्यात अखेर भाजपाला मोठे यश लाभले.
या निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी सकाळपासून सुरुवात झाली तेव्हा प्रारंभी भालके यांनी पहिल्या चार फेऱ्यांत आघाडी घेतली होती पण नंतर आवताडे यांनीही बाजी मारत पुढील चार फेऱ्यांत आघाडी घेतली. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र १०व्या फेरीपासून आवताडे यांनी प्रारंभी १००० मतांची आघाडी घेतली ती काही फेऱ्यांत थोडी खालीही आली. पण आवताडे यांनी आघाडी सोडली नाही. शेवटच्या काही फेऱ्यात ही आघाडी ४ हजार ते ६ हजार मतांच्या प्रमाणात वाढली. शेवटी आवताडे यांनी ३७१६ मतांनी विजय मिळविला.
आवताडे यांनी याआधीही या मतदारसंघातून दोनवेळा निवडणूक लढवून प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर दिली होती. तो विचार करून त्यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भारत भालके यांच्या अकाली झालेल्या मृत्युमुळे त्यांचे पुत्र भगीरथ यांना सहानुभूती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आवताडे यांनी अखेर बाजी मारली.