एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही काहीही तोडगा निघालेला नाही. गेले १२ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर संप पुकारला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना या संपावर तोडगा काढून कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्याय न मिळाल्यास सरकारच तेरावं घालण्यात येईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
सदाभाऊ खोत यांनी म्हटले की, बैठक घेतल्याचा दिखावा करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही. परिवहन मंत्र्यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. परिवहन मंत्री शकुनी मामाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे कामगारांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. उद्या तेरावं घालणार, नंतर चौदाव्या दिवशी गोड करणार आणि पंधराव्या दिवशी कडू करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘महाविकास आघाडीचा अजब कारभार हर्बल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा’
देवेंद्र फडणवीस दंगलग्रस्त अमरावतीच्या दौऱ्यावर
अमेरिकेत राष्ट्रपती पदाची सूत्रे उपराष्ट्रपतींकडे सोपवू शकतात मग महाराष्ट्रात का नाही?
स्वदेशी आयएनएस विशाखापट्टणम नौदलात दाखल!
विलिनीकरण अशक्य आहे, असे आता सांगण्यात येत आहे. तुमची समिती विलिनीकरणाचा अहवाल हा विरोधातच येणार आहे. हे लिहून ठेवा, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. येत्या काळात आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत. एस टी कर्मचाऱ्यांची लेकरं बाळं उपाशी आहेत. याचा कुणीही विचार करायला तयार नाही, असेही ते म्हणाले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण ही प्रमुख मागणी मान्य व्हावी यासाठी एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.