पवारसाहेब पावसात भिजले; पण पावसात भिजणाऱ्या कामगारांच्या अश्रुंचे काय?

पवारसाहेब पावसात भिजले; पण पावसात भिजणाऱ्या कामगारांच्या अश्रुंचे काय?

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांसोबत मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून बसले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

‘शरद पवार साहेब जे म्हणत आहेत की, मध्य मार्ग काढू, तर आम्ही कुठे म्हणतोय की आडवळणाने जाऊ. मध्य मार्ग काय आहे तो पवारसाहेब तुम्ही सांगा. ते अभ्यासू व्यक्ती आहेत. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. पण नेमका कोणत्या दिशेला म्हणजेच पूर्वेला आहे, दक्षिणेला आहे की उत्तरेला आहे हे मात्र कधीच कुणाला समजून आलेले नाही,’ असा टोला सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लगावला आहे.

हे ही वाचा:

सामाजिक कार्यकर्ते वसंत सुर्वे यांचे निधन

शिवसेना जिल्हाप्रमुखाचा ‘गुटखा’ जप्त?

मनात वाईट विचार असणारे अर्धवट माहिती प्रसिद्ध करतात; क्रांती रेडकर यांचे उत्तर

फडणवीसांच्या दारी राज्याचे कारभारी

‘राजकारण राजकारणाच्या जागी राहू द्या. पण ज्या कामगारांनी तुम्हाला मोठं केलं असं त्यांच्या अधिवेशनात तुम्ही सांगत असता; मग त्या कामगारांचे अश्रू पवारसाहेबांना का दिसले नाहीत?’ असा सवालही सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे. ‘पवार साहेब पावसात भिजले, पण आज एसटी कर्मचारी पवासात भिजतोय, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम पवारसाहेब करत नाहीत, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,’ असेही सदा भाऊ खोत म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांनीही शरद पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली. ‘शरद पवार यांनीच खऱ्या अर्थाने मागील ५० वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला आहे. त्यांची एकमेव संघटना मान्यताप्राप्त आहे. मात्र, राज्य सरकार मान्यताप्राप्त संघटनेशीच चर्चा करते. मात्र आजपर्यंत पवारांच्या संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांचे मूळ प्रश्न राज्य सरकारसमोर कधी मांडेलच नाहीत. सरकार आणि मान्यताप्राप्त संघटनांनी मिळून कर्मचाऱ्यांचा घात केला,’ असे गोपीचंद पडळकर म्हणाले. ‘शरद पवार जर २०५० पर्यंत राहिले तरी तेव्हा ते एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात १९८० आणि २०२० मधल्या भाषणातील मुद्दे सांगतील. जर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले तर त्यांची संघटना उरणार नाही. निवडणुकीवेळी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करता येणार नाही,’ असा खोचक टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

Exit mobile version