एनआयएच्या ताब्यात असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या डायरीतून अनेक आर्थिक व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. एनआयएच्या हाती वाझेची २०० पानी डायरी लागली आहे. सचिन वाझेच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे.
सचिन वाझेच्या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंदही आहे.
लाखाच्या नोंदीसाठी एल हे इंग्रजी अक्षर (L), तर हजाराच्या नोंदीसाठी के हे इंग्रजी अक्षर (K) वापरले आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही लिहिली आहे. या पैशाचं वाटप नियमित होत होतं. त्याबाबतही कोड भाषेत नोंद आहे. व्यक्तीऐवजी विभाग लिहिण्यात आला आहे.
हे ही वाचा:
पवार साहेब सांगतील ते ब्रह्मवाक्य
म्हणे महाराष्ट्रात फिरू देणार नाही. बापजाद्यांची मालमत्ता आहे का तुमच्या?- अतुल भातखळकर
हॉस्पिटलनेच उघडे पाडले देशमुख-पवारांचे पितळ
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; संसदेत खासदारांची मागणी
एनआयए आणि ईडी समांतर तपास करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच आलिशान गाड्या, साडेपाच लाखांची रोकड, पैसे मोजण्याचं मशीन आणि संशयित डायरी ईडीच्या रडारवर आहे. गुन्ह्यात आर्थिक गैरव्यवहाराचा तपास ईडी करण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे यांच्या जप्त केलेल्या मोबाईलमधूनही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. पोलिस दलात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस येणार असल्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे.