सचिन वाझेंनीच केला मनसुख हिरेन यांचा खून?

सचिन वाझेंनीच केला मनसुख हिरेन यांचा खून?

मनसुख हिरेन हत्त्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मनसुख हिरेन यांचा खून एपीआय सचिन वाझेंनीच केला असण्याची शक्यता मनसुख हिरेन यांच्या पत्नी, विमला हिरेन यांनी व्यक्त केली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विमला हिरेन यांचा जवाब वाचून दाखवला. त्यातून हा खुलासा झाला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू ठाणे येथे ५ मार्च रोजी झाला. ठाणे येथील मुंब्र्याजवळच्या खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उचलल्यानंतर थोड्याच वेळात मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. फडणवीस यांनी हिरेन यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी ५ मार्च रोजीच विधानसभेत केली होती.

हे ही वाचा:

मनसुख हत्या प्रकरणातील ‘काळंबेर’ उघड होण्याचे भय कोणाला?

सचिन वाझे यांची संपूर्ण कारकीर्दच वादग्रस्त राहिलेली आहे. पोलीस कोठडीत झालेल्या ख्वाजा युनूसच्या हत्त्या प्रकरणात ते आरोपी होते. अनेक वर्ष त्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. विद्यमान पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पोलीस सेवेत पुन्हा बहाल केले. त्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती, परंतु निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांचा राजीनामा न स्वीकारला गेल्यामुळे ते पुन्हा सेवेत आले. ज्येष्ठ पत्रकार आणि रिपब्लिक मीडियाचे प्रमुख अर्णब गोस्वमी यांना अटक करण्यासाठी वाझे यांनाच पाठवण्यात आले होते. आता हिरेन प्रकरणामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

हे ही वाचा:

“माझे पती आत्महत्येचा विचारही करू शकत नाहीत” – विमला हिरेन

आज या विषयावरील विमला हिरेन यांचा जवाब वाचून दाखवत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली. विमला हिरेन यांच्या जवाबामध्ये त्यांनी स्पष्टपणे ही माहिती दिली आहे की सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची चौकशी केली होती. वाझेंकडून हिरेन यांना असेही सांगण्यात आले होते की, “तू या प्रकरणात अटक करून घे, मी दोन दिवसात तुला जामिनावर बाहेर काढतो.” हिरेन आणि वाझे यांचे जुने संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हिरेन यांनी त्यांची गाडी नोव्हेंबर २०२० मध्ये वाझेंना वापरायला दिली होती, जी त्यांनी ५ फेब्रुवारी २०२१ मध्ये परत केली होती. याचाच अर्थ वाझेंनी ४ महिने हिरेन यांची गाडी वापरली होती हे स्पष्ट आहे.

“कलम २०१ खाली सचिन वाझेंना अटक का होत नाही?” असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Exit mobile version