वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी एनआयएकडून अटक करण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली. शनिवारी सचिन वाझे पेडर रोड येथील राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. तेरा तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर वाझेंना अटक करण्यात आली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या घराबाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. सुरवातीचा आठवडा या प्रकरणात सचिन वाझे हे तपास अधिकारी म्हणून काम करत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी फडणवीस यांनी वाझेंबद्दल संशय व्यक्त केला होता. “जिलेटीनने भरलेल्या गाडीची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा स्थानिक पोलिसांच्या आधी वाझे तिथे पोहोचलेले होते. हिजबुल मुजाहुद्दीनच्या धमकीचे खोटे पत्रही वाझेंनाच सापडले होते. स्कॉप्रिओचे मालक असलेले मनसुख हिरेन हे वाझे यांच्या आधीपासूनच संपर्कात होते.” असा दावा फडणवीस यांनी विधानसभेत केला आणि त्याबाबतचे पुरावे देखील दिले.
हे ही वाचा:
सचिन वाझेंना अटकपूर्व जामीन नाकारला
सचिन वाझेंना अटकपूर्व जामीन नाकारला
मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे सोबतच एका विधान परिषदेच्या आमदाराचेही नाव?
कोर्टाने सचिन वाझेंबाबत गंभीर नोंदी केल्या आहेत. हा गुन्हा हत्येच्या कलमांतर्गत नोंदवला आहे, असे कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे. हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात, गुन्हेगारी, कट कारस्थान दिसत आहे. प्राथमिकदृष्ट्या हे सर्व अर्जदाराच्या विरोधात आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांना याच मुद्द्यावरून सळो की पळो करून सोडलं होतं. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा पोलिसांकडे दिलेला जवाब त्यांनी विधानसभेत वाचून दाखवला. या जवाबत विमला हिरेन यांनी स्पष्टपणे सचिन वाझेंवर मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय उपस्थित केला होता. सरकारने वाझेंची बदली करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेरीस पुरावांच्या जोरावर, कोर्टाने अटकपूर्व जमीन नाकारल्यामुळे, वाझेंना अखेर तुरुंगवास भोगावाच लागला.
या सर्व पार्श्वभूमीवर अनेक दिवसांच्या राजकीय हलकल्लोळानंतर सचिन वाझेंना अखेर अटक करण्यात आली आहे.