काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी पत्नी सारा अब्दुल्ला यांच्याशी घटस्फोट घेतल्याचे पहिल्यांदाच उघड झाले आहे. सारा या जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या कन्या आहेत.
सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला हे दोघे सुमारे दोन दशकांच्या विवाहानंतर विभक्त झाले आहेत. आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब उघड झाली आहे. प्रतिज्ञापत्रातील पत्नीच्या रकान्यासमोर त्यांनी ‘विभक्त’ असे लिहिले आहे. ४६ वर्षीय सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच ते विभक्त असल्याचे उघड केले आहे.
हे ही वाचा:
वानखेडे स्टेडियम वर्ल्डकपदरम्यान आतषबाजीने रंगणार नाही
जाळपोळ करणाऱ्यांविरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याचे गुन्हे!
२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार
मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल
सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला यांचा विवाह सन २००४मध्ये झाला होता. त्यांना आरन आणि विहान असे दोन पुत्र आहेत. ही दोन्ही मुले त्यांच्यावर अवलंबून असल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांच्या संपत्तीतही गेल्या पाच वर्षांत दुप्पट वाढ झाली आहे. सन २०१८मध्ये त्यांची एकूण मालमत्ता ही ३.८ कोटी होती. ती सन २०२३मध्ये ७.५ कोटी रुपये झाली आहे. राजस्थान विधानसभेच्या निवडणुका २५ नोव्हेंबर रोजी होणार असून ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल.