शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या पुणे आवृत्तीच्या पहिल्याच पानावर पुणे मेट्रोच्या उद्घाटनाची संपूर्ण पानभर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्याचीच रविवारी चर्चा सुरू होती.
पंतप्रधान मोदींबद्दल आणि भाजपाबद्दल सातत्याने अत्यंत टोकाचे लिखाण करणाऱ्या सामना वर्तमानपत्रात ही जाहिरात आल्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनाही लक्ष्य केले जात आहे. शेवटी आर्थिक बाब लक्षात घेता जाहिराती घ्याव्याच लागतात, अशी भावना नेटकरी व्यक्त करत आहेत.
वचनपूर्ती भाजपाची, स्वप्नपूर्ती पुणेकरांची अशा मथळ्याने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे छायाचित्र असून महाराष्ट्रातील विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पुण्यातील इतर भाजपा खासदार, कार्यकर्त्यांची छायाचित्रे त्यावर आहेत. निमंत्रक म्हणून पुण्याच्या महापौरांचे छायाचित्र आहे. तसेच पुणे महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन, नदीसुधार प्रकल्प या कार्यक्रमांची नावेही त्यात देण्यात आली आहेत.
पुण्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत या विविध विकासकामांचे उद्घाटन, शुभारंभ रविवार पार पडले. त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याशिवाय, पुण्यातील सिम्बायोसिसमध्येही पंतप्रधान जाणार होते. त्याचीही जाहिरात सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. यावरून नेटकऱ्यांनी सामना संपादकांची खिल्ली उडविली. शेवटी पैशाचा प्रश्न आला की, विरोध मावळतो अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. एरवी भाजपा आणि मोदींना तीव्र विरोध करता मग जाहिरात का घेतली असाही सवाल काही नेटकऱ्यांनी विचारला.
हे ही वाचा:
भारतीय महिलांनी पाकिस्तानला नमवून केली वर्ल्डकपची दमदार सुरुवात
४३४; फिरकीपटू अश्विनकडून कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी
शहरवासियांनो मेट्रोनेच प्रवास करा! पंतप्रधान मोदींचे आवाहन
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा आणि केंद्र सरकारवर सातत्याने आपल्या अग्रलेखांतून टीका करत आले आहेत. पण आज त्याच भाजपाची जाहिरात वर्तमानपत्रात का लावली असा सवाल नेटकरी करत आहेत.