ऋतुजा लटके अडचणीत, पालिका सेवेचा राजीनामा दिला पण…

ऋतुजा लटके अडचणीत, पालिका सेवेचा राजीनामा दिला पण…

अंधेरी पूर्व येथील निवडणुकीसाठी दिवंगत माजी आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे २ दिवस शिल्लक आहेत. पण तो अर्ज भरण्यासाठी मार्ग मोकळा झालेला नाही.

रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर तिथे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेच्या वतीने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेत काम करतात. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी त्यांना या नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल. तो राजीनामा त्यांनी आपल्या विभागाला सादर केलेला आहे. मात्र तो अद्याप मंजूर झालेला नाही. ऋतुजा लटके या महापालिका परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात काम करत असून हा विभाग महापालिका आयुक्तांच्या अखत्यारित येत असल्याने एक महिन्यापूर्वी सादर केलेल्या या अर्जावर तातडीने निर्णय घ्यावा म्हणून आता प्रयत्न सुरू आहेत.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर शरद पोंक्षे यांचे शुक्रवारी व्याख्यान

नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव

नितीन गडकरींनी भारतातील पहिली इथेनॉल कार केली लॉन्च

पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे

 

शिवसेनेचे प्रवक्ते आणि माजी मंत्री अनिल परब हे यासाठी धावाधाव करत आहेत. सोमवारी त्यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी नगरसेवक मनोहर पांचाळ, सुभाष कांता सावंत, प्रमोद सावंत हेदेखील सोबत होते.

प्रशासन विभागाचे सहआयुक्त मिलिन सावंत यांचीही भेट घेऊन परब यांनी राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.

पालिकेचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत की, ज्या कर्मचाऱ्याची २० वर्षे सेवा पूर्ण झाली असेल तोच राजीनामा देऊ शकतो किंवा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करू शकतो. पण तीन महिन्यांमध्ये यावर निर्णय झाला नाही आणि संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत न कळविल्यास त्याचा अर्ज मान्य झाला असे गृहित धरले जाते. लटके यांचा सेवा कालावधी तपासावा लागणार आहे. त्यानंतरच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर केला जाईल. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक असल्याने लटके यांची चांगलीच अडचण झाली आहे.

Exit mobile version