अंधेरी पोट निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबई महानगरपालिकेत लिपिक असलेल्या ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. लटके यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी लिपिक पदाचा राजीनामा मुंबई महापालिका आयुक्तांनी मंजूर न केल्याने अडचण निर्माण झाली आहे. अनिल परब यांनी महापालिका आयुक्तांवर राजकीय दबाव असल्याने हा राजीनामा दबावमुळे मंजूर केला जात नसल्याचा आरोप केला आहे. लटके यांनी राजीनामा प्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे. राजीनाम्याच्या सर्व अटी शर्तींची पूर्तता केली आहे त्यामुळे लटके यांचा राजीनामा मंजूर करावा अशी मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी पोट निवडणूक होत आहे. रमेश लटके यांच्या जागी त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. महापालिकेच्या कर्मचारी असलेल्या लटके यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस उरलेले आहेत, पण अद्याप त्यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केलेला नाही. त्यामुळे लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब यांनी सांगितले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला २ सप्टेंबर तो चुकीचं होता हे एक महिन्याने महापालिकेने सांगितले. मग ३ ऑक्टोबर रोजी पुन्हा राजीनामा दिला. पण अजूनही राजीनामा स्वीकारला नसून टाळाटाळी करण्यात येत असल्याचा आरोप परब यांनी केला आहे.
हे ही वाचा:
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा
उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल
ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना शिंदे गटाकडे या. निवडणूक लढा. मंत्रिपदाची ऑफर दिली असल्याच्या बातम्या येत आहेत. पण लटके कुटुंबीय कट्टर शिवसैनिक आहेत. पण अंधेरीची जागा आम्ही लढणार आणि जिंकणार असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला. राजीनामा स्वीकारण्याची प्रक्रिया आहे त्यांचे फाईल तयार झाली ती आता फिरत आहे. राजीनामा मंजूर करत नाही असं लेखी लिहून द्या असं महापालिका आयुक्तांना सांगितलं पण अजूनही प्रतिसाद नाही. महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचे चित्र स्पष्ट असल्याचं आरोप अनिल परब यांनी केला आहे.