युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भारताला मोठा फायदा होताना दिसत आहे. भारतातील गव्हाच्या किमतीने, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ओलांडली आहे. इजिप्तसह अनेक देशांनी गव्हाच्या आयातीसाठी भारताशी संपर्क साधला आहे. देशात गव्हाचा एमएसपी केवळ २ हजार ५० रुपये आहे, तर बाजारभाव २ हजार २५० रुपयांवरून २ हजार ३०० रुपये झाला आहे.
भारताला रशियाकडून स्वस्तात कच्चे तेलही मिळणार आहे. रशियाने यावर्षी भारताला १५ दशलक्ष बॅरल कच्चे तेल देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय भारताला प्रति बॅरल ३५ डॉलरपर्यंत सूटही दिली जात आहे. भारत हा अशा देशांपैकी एक आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय दबाव आणि निर्बंधांमध्येही रशियाकडून तेल खरेदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाकडून तेल आयात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत रशिया आशियामध्येच तेल खरेदीदार शोधण्यात व्यस्त आहे. रशियाला विशेषत: चीन आणि भारताकडून खूप आशा आहेत. भारत आणि चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह अनेक मंचांवर रशियाला विरोध केलेला नाही.
रशियानेही भारताला तेल खरेदीत रुपया-रुबल पेमेंट सिस्टीमचा अवलंब करण्याची सुविधा देण्यास सांगितले आहे. ही परिस्थिती भारतासाठी अधिक चांगली असेल कारण भारताला परकीय चलनाच्या साठ्यातून खर्च करावा लागणार नाही. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव गुरुवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. रशियाकडून तेल खरेदीची प्रक्रिया भारतीय कंपनी इंडियन ऑईलच्या माध्यमातून केली जाणार आहे. भारत किती तेल खरेदी करेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु किमान १५ दशलक्ष बॅरल आयात करण्याचा करार होऊ शकतो.
हे ही वाचा:
श्रीलंकेत आर्थिक संकटाचा निषेध; राजधानी कोलंबोत कर्फ्यू
किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर
‘श्रेयवादाच्या नादात अपयशाचं खापर ठाकरे सरकारवर फुटेल’
दिलीप वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! काँग्रेस-शिवसेना गृह खात्यावर नाराज असल्याची चर्चा
जेव्हापासून रशियाकडून तेल खरेदी करणार असल्याचे वृत्त आले तेव्हापासून तेल कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत इंडियन ऑइलच्या शेअर्समध्ये २.३ टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय हिंदुस्थान पेट्रोलियमच्या शेअर्समध्येही २.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.