राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रमक नेत्या, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. बुधवार, २३ मार्च रोजी चाकणकर यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर आले आहे. चाकणकर यांची नियुक्ती राज्य महिला आयोगावर अध्यक्ष म्हणून झाल्यामुळे त्या राजकीय पदाचा राजीनामा देत असल्याचे समजते.
रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त अचानक समोर आल्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली होती. या राजीनाम्या मागचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे हा राजीनामा प्रत्यक्षात नाराजीनामा आहे की यामागे आणखी काही कारण आहे? या बद्दल कुजबूज सुरू होती. पण अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती हे राजीनाम्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा
प्रवीण दरेकरांना न्यायालयाकडून दिलासा; अटकेपासून संरक्षण
…आणि भारताने गाठले चार अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य
नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. एकीकडे राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांचा आलेख वाढत होता, तर दुसरीकडे राज्याचा महिला आयोग गठीत करण्यात आला नव्हता. यामुळे सरकारवर जोरदार टीका होत होती. केंद्रीय महिला आयोगाच्या सदस्यां कडूनही ही गोष्ट अधोरेखित करण्यात आली होती आणि राज्यात महिला आयोग लवकरात लवकर गठीत व्हावा अशी मागणी ठिकठिकाणांहून होताना दिसत होती. अखेर गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली.