वट पौर्णिमेसंबंधित वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांवर होतेय टीका

वट पौर्णिमेसंबंधित वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांवर होतेय टीका

“वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील मला कधी आग्रह केला नाही किंवा माझ्या नवऱ्याने पण कधी तसा हट्ट केला नाही,” असे वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज, १४ जून रोजी केले. त्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत असून लोकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी असे वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. हिंदू सणांविरोधात असल्याचे काहींनी म्हटले आहे तर काहींनी म्हटले आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही हिंदू विरोधी असल्याचे म्हटले आहे. आम्ही मात्र, संस्कृती पालन करण्यासाठी, हिंदू धर्म जपण्यासाठी पूजा करणार असल्याचे काही लोकांनी म्हटले आहे.

हेरवाडच्या धर्तीवर खडकवासला धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या भाषण करत होत्या. समाजात अनेक अनिष्ठ प्रथा परंपरा प्रचलित असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी वट पोर्णिमेवर भाष्य केलं.

हे ही वाचा:

भारतातील वेबसाईट्सवर हॅकर्सचा हल्ला

नुपूर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

अमेझॉनला ‘या’ प्रकरणात दोनशे कोटींचा दंड

मोदी सरकार १० लाख नोकऱ्या देणार

“आपला समाज महिलांना रुढी परंपरांमध्ये जखडून ठेऊन त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतो. वटपौर्णिमेचं उदाहारण घ्या. अनेक महिला वडाला फेरे मारतात. सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना करतात. पण त्यातीलच काही महिला नवरा त्रास देतो म्हणून तक्रारही करत असतात. शेवटी समाज काय म्हणेल म्हणून त्यांना वडाची पूजा करावी लागते. आम्हाला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी सत्यवानची सावित्री फार लवकर समजली पण आमच्या शिक्षणासाठी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे झेलणारी ज्योतिबाची सावित्री अजुनही समजली नाही, हे आमचे दुर्दैव आहे. खरं तर ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे,” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Exit mobile version